Tharla Tar Mag Fame Actress Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या कोर्टरुम ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत महिपत आणि साक्षीची वकील दामिनीची एन्ट्री झाल्यापासून अर्जुन बराच सावध झाला आहे. सध्या अर्जुन आश्रम केसचा नव्याने तपास करत आहे. यादरम्यान, अर्जुनला प्रियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडतात. आता या पुराव्यांच्या आधारावर अर्जुन प्रियाची कोंडी कशी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रियाची मानसोपचार तज्ज्ञांनी चौकशी केल्यावर मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरुम ड्रामा सुरू होणार आहे. या मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहून ‘ठरलं तर मग’मध्ये लवकरच कोर्टरुम ड्रामा सुरू होईल असं स्पष्ट झालेलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका जवळपास अडीच वर्षे टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत आहे. या कलाकारांचं मालिकेत एकमेकांशी कसंही नातं असलं तरीही, प्रत्यक्षात ऑफस्क्रीन सगळेच कलाकार एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहेत. मालिकेची नायिका जुई गडकरी आणि साक्षी हे खलनायिकेचं पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव देखील एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. सध्या जुईने शेअर केलेली केतकीबद्दलची एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मालिकांचं शूटिंग जवळपास दिवसाचे १२ तास चालतं. सेटवर एखाद्या सीनचं शूट सुरू असताना मोबाइल फोन सायलेंट करणं गरजेचं असतं जेणेकरून चालू सीनमध्ये कोणालाही त्रास होणार नाही. नकळतपणे शूटिंग करताना एखाद्याचा मोबाइल फोन वाजला तर, कलाकारांना ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर एक गोड शिक्षा देण्यात येते.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर शूटिंगच्या दरम्यान फोन वाजल्यास संबंधित कलाकार सगळ्या टीमला आईस्क्रीम पार्टी देतो. नुकताच हा मजेशीर प्रसंग मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या केतकीबरोबर घडला… आणि अभिनेत्रीने मोठ्या प्रेमाने सर्वांना आईस्क्रीम दिलं. याचा व्हिडीओ जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“जेव्हा एखाद्या सीनचं सेटवर शूट चालू असतं आणि मध्ये फोन वाजतो…तेव्हा सगळ्यांना आईस्क्रिम देण्याची शिक्षा मिळते. ओळखा पाहू आज कोणाचा फोन टेकमध्ये वाजला…” असं कॅप्शन देत जुईने या पोस्टमध्ये केतकी पालवला टॅग केलं आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर अशा बऱ्याच गमतीजमती घडत असतात. सगळ्या कलाकारांमध्ये असलेलं हे ऑफस्क्रीन सुंदर बॉण्डिंग…यामुळेच आमची मालिका टीआरपीमध्ये अग्रेसर आहे असं या मालिकेच्या टीमने काही दिवसांपूर्वी लाइव्ह सेशन घेत सांगितलं होतं.