Jahnavi Killekar New Home : जान्हवी किल्लेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘बिग बॉस मराठी’मुळे. या शोमुळे तिचं पूर्ण आयुष्य बदललं. तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली, याबद्दल तिने सांगितलं आहे. सध्या ती ‘द ५०’ या शोमुळे चर्चेत आहे.

‘द ५०’ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये तिच्यासह काही इतर मराठी कलाकार तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरेसुद्धा पाहायला मिळत आहेत. या घरात जाण्यापूर्वी जान्हवी किल्लेकरने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली, जिथे तिने तिच्या नवीन घराची सफर घडवली आहे. यावेळी तिने नवीन घर, वास्तुशास्त्र याबद्दल सांगितलं आहे.

नवीन घराबद्दल जान्हवीची प्रतिक्रिया

‘द ५०’मध्ये जाण्यापूर्वी जान्हवीने तिच्या या होम टूरच्या व्हिडीओमध्ये तिचा वास्तुशास्त्रावर खूप विश्वास आहे आणि ती जेवतानासुद्धा ठराविक दिशेत बसते असं म्हटलं आहे. जान्हवीने मुंबईत खरेदी केलेल्या नवीन घराबद्दल ती म्हणाली, “मी सगळं अगदी घरातील प्रत्येक कोपरा स्वतः सजवला आहे. मी सगळ्या वस्तू स्वतः शोधून आणल्या आहेत. हे घर खरेदी केलं तेव्हा घराला पूर्ण पांढरा रंग होता, पण मी त्यावर मला आवडणारे वेगवेगळे वॉल पेपर लावले आहेत.”

जान्हवीच्या या नवीन घरात तीन मोठे व डिझायनर झुंबरदेखील आहेत, जे तिच्या घराची शोभा वाढवतात. जान्हवी याबद्दल म्हणाली, “हे मी स्वतः जाऊन एका मार्केटमधून आणलं आहे. मला कुठेच मिळत नव्हतं आणि मला ऑनलाइन हे विकत घ्यायचं नव्हतं.” जान्हवीने या मुलाखतीत तिला झाडं खूप आवडतात, म्हणून तिच्या घरी प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी रोपं तिने ठेवली आहेत असं सांगितलं आहे.

वास्तुशास्त्राबद्दल जान्हवी म्हणाली, “माझ्या घरात सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार ठेवण्यात आल्या आहेत. मी महत्त्वाच्या कामासंदर्भातील फोन कॉल्ससुद्धा एका ठराविक दिशेत उभी राहूनच घेते. जेवतानासुद्धा मी दिशा बघून जेवते, माझा यावर खूप विश्वास आहे आणि याचा मला खूप फायदाही जाणवला आहे. एक गुरुजी आहेत जे मला याबद्दल मार्गदर्शन करतात.”