The 50 Grand Finale Update : हिंदीसह मराठी टेलिव्हिजनवर अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि या शोला प्रेक्षकांनीसुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच साधारण महिनाभरापूर्वी, १ फेब्रुवारीपासून ‘The 50’ नावाचा एक नवा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. साधारण दीड महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता या शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर झाली आहे.

कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला The 50 हा रिअ‍ॅलिटी शो आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या शोमध्ये टेलिव्हिजन, फिटनेस आणि डिजिटल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

The 50 शोच्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ…

अनेक आव्हानात्मक टास्क, वाद आणि स्पर्धकांच्या अनपेक्षित एलिमिनेशननंतर आता या शोचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ‘द ५०’ चा ग्रँड फिनाले रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. हा सोहळा कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता आणि जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल.

Award Banner

The 50 शोच्या विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार…

या शोच्या नियमांनुसार, विजेत्या स्पर्धकाला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, विजेत्या स्पर्धकाच्या एका नशीबवान चाहत्यालाही ५० लाख रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे एकूण बक्षीसाची रक्कम १ कोटी रुपये इतकी होते.

अंतिम फेरीत जाणाऱ्या १२ स्पर्धकांमध्ये प्रिन्स नरुला, मिस्टर फैसू (फैसल शेख), रजत दलाल, शिव ठाकरे, इमॉर्टल काका (रविंदर सिंग), कृष्णा श्रॉफ, उर्वशी ढोलकिया, रिद्धी डोगरा, मनीषा राणी, अर्चना गौतम, विक्रांत सिंग आणि नेहल चुडासामा या स्पर्धकांचा समावेश आहे. यापैकी केवळ टॉप-४ स्पर्धकच विजेता बनण्याच्या अंतिम शर्यतीत राहतील आणि हे चार स्पर्धक शिव ठाकरे, मिस्टर फैसू, रजत दलाल आणि इमॉर्टल काका असतील.

काही चर्चांनुसार, प्रिन्स नरुलाने आपली ‘तिकीट टू फिनाले’ शिव ठाकरेला देऊन त्याला स्पर्धेत पुढे जाण्यास मदत केली आहे, त्यामुळे शिव ठाकरे या शोचा विजेता होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे या शोचा विजेता झाल्याच्या पोस्ट समोर आल्या होत्या.

अर्थात, या सगळ्या चर्चा आहेत. आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे यावर ग्रँड फिनालेमध्येच शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे ग्रँड फिनालेमध्ये नक्की काय घडणार? कोण या शोचा विजेता बनणार? यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.