एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं. अप्पू आणि शशांकच्या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली. पण गेल्या वर्षी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता मालिकेतील कलाकार नवनवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील मानसी कानिटकर म्हणजेच अभिनेत्री सई कल्याणकर ‘शुभविवाह’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री मधुरा देशपांडे व अभिनेता यशोमन आपटे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘शुभविवाह’ मालिका ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. याच मालिकेत सईची एन्ट्री होणार असून एका महत्त्वाच्या भूमिकेत ती दिसणार आहे. याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – ‘हीरामंडी’ व ‘शैतान’नंतर या आठवड्यात OTT वर येणार ‘हे’ जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा यादी

‘शुभविवाह’ मालिकेच्या पुढील भागात काय होणार? याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री सई कल्याणकरची एन्ट्री पाहायला मिळत आहे. सई ‘शुभविवाह’ मालिकेत आकाशची मैत्रीण वेदांगीच्या भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या भूमिकेत, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण; अक्षया म्हणते, “हे पात्र…”

याआधी अभिनेत्री सई कल्याणकर ‘सन मराठी’वरील ‘अबोल प्रीतीची अजब कहानी’ मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत सईची बाईकवरून जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली होती. अभिनेत्री जान्हवी तांबट व अभिनेता अजिंक्य राऊत यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत सईने जोजोची भूमिका साकारली होती.

हेही वाचा – “पहिली गाडी घेतली पण, तेव्हा बाबा नव्हते”, वडिलांच्या आठवणीत गौरव मोरे भावुक; म्हणाला, “मी आणि आई…”

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेपूर्वी सईने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकात काम केलं आहे. ‘तुझे नि माझे घर श्रीमंताचं’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘बाप्पा मोरया’ आणि ‘भेटी लागी जिवा’, ‘फ्रेशर्स’ या मालिकांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘फ्रेशर्स’ मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. याशिवाय सई अभिनेता अंकुश चौधरीबरोबर ‘झक्कास’ चित्रपटात झळकली होती. तसंच तिने ‘आम्ही पाचपुते’ नाटकात महत्त्वाची भूमिका निभावली होती.