मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचं दुसरं लग्न लाऊन दिलं होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धार्थने ही बातमी दिली होती. सिद्धार्थच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. सिद्धार्थच्या आईनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने आईचे अभिनंदन करत याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे,

हेही वाचा- टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत चुरस; टॉप-१० मालिका जाणून घ्या…

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता फडकेच्या आईने नुकतंच दुसरं लग्न केलं. अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अमृताने ‘मानसी वहिनी’ म्हणजे मानसी कानिटकर हे पात्र साकारलं होतं. मालिका संपली असली तरी अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देतच असते. आता तिने आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अमृताने तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “आई अभिनंदन. ८.१२.२०२३, तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, अशी सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते, पण तस वाटणं, तसं मिळणं व घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही; पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळत आहे, तेही तुझ्या 2nd inningच्या टप्प्यावर!” असं अमृताने म्हटल आहे. “खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं, अशी मनापासून इच्छा होती. माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हतं, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस, ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे. मनाने खूप श्रीमंत असलेल्या, खूप मोठ्या कुटुंबाचा मी तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय, त्यासाठी तुझी आभारी आहे.”

अमृताने पुढे लिहिलं, “आई, या वयात आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत लागते. त्यासाठी खरंतर दोघांनाही सलाम. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना.” अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केलं आहे.

Story img Loader