Dnyanada Ramtirthkar Kelvan : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ज्ञानदाने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. ज्ञानदाच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने तिच्या जवळच्या मित्रमंडळींनी ज्ञानदाच्या केळवणासाठी खास तयारी केली होती.

ज्ञानदा रामतीर्थकर आणि तिचा होणारा नवरा हर्षद या दोघांचं केळवण ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील कलाकारांनी थाटामाटात केलं आहे. ज्ञानदा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्याआधी ‘ठिपक्यांची रांगोळी’ या सुपरहिट कौटुंबिक मालिकेत झळकली होती. ही मालिका संपून आता जवळपास दोन-अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही यातील सगळ्या कलाकारांचं एकमेकांशी असलेलं बॉण्डिंग तेवढंच सुंदर आहे.

ज्ञानदासाठी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील कलाकारांनी खास जेवणाचा बेत केला होता. सुंदर अशी सजावट करून या सगळ्या कलाकारांनी एकत्र छान फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री नम्रता प्रधानने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय अभिनेत्री सुप्रिया पाठारे सुद्धा त्यांच्या लाडक्या अप्पूच्या केळवणासाठी उपस्थित होत्या.

नम्रता प्रधान लिहिते, “ज्ञानदा आणि हर्षदचं केळवण…गेली अनेक वर्षे आम्ही सगळ्यांनी एकत्र अनेक गोष्टी सेलिब्रेट केल्या. पण, त्यामध्ये सगळ्यात सुंदर हा दिवस आहे…ज्ञानदा-हर्षद तुम्हा दोघांनांही शुभेच्छा!”

नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे हर्षद आत्माराम. तो सिनेमॅटोग्राफर, DOP आहे. आता रिलेशनशिपला जवळपास सहा ते सात वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडणार आहेत.

दरम्यान, ज्ञानदा रामतीर्थकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आउट’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.