अभिनेत्री हिना खान(Hina Khan) कर्करोगाशी लढा देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर तिला म्युकोसिटिस आजाराचे निदान झाल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये स्वत:चे दोन फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने म्हटले, “हसणे आणि प्रोत्साहन देत राहणे, हे मी स्वत:साठी निवडले आहे.”
“नकारात्मक होण्यासाठी कोणतेही कारण नाही”
हिना खानने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर करीत लिहिले, “सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय; पण हसणे गेले नाही पाहिजे, हो ना? खूप समस्या आहेत. इतकेच काय, वेदना झाल्याशिवाय नीट खाऊदेखील शकत नाही. पण, नकारात्मक होण्यासाठी कोणतेही कारण नाही. हसणे आणि स्वत:ला प्रोत्साहन देत राहणे, हे मी निवडले आहे. मी स्वत:ला सांगितले आहे, हे सगळे संपणार आहे आणि आपण यातून मार्ग काढू. एका वेळी एक स्माइल.”
तिच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकारांनी लवकर बरी हो, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. अभिनेत्री दीपिका सिंग लिहिते, “स्वत: इतक्या वेदना सहन करीत असूनही तू स्वत:मधील सकारात्मकतेने इतरांना प्रोत्साहन देण्याचा मार्ग निवडलास, तू लवकर बरी व्हावीस यासाठी प्रार्थना करीत आहोत.”
हिनाने केमोथेरपीमुळे तिला इतर म्युकोसिटिसचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी ती डॉक्टरांच्या सल्ला घेत असल्याचे म्हटले होते. त्याबरोबरच चाहत्यांना तिने म्हटले होते, “जेव्हा तुम्ही काही खाऊ शकत नाही, तेव्हा खूप अवघड असते. त्यावर काही उपाय असतील तर सुचवा, त्याची खूप मदत होते.”
हिना खान ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे अक्षराच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येदेखील ती सहभागी झाली होती. काही म्युझिक व्हिडीओमध्येही ती दिसली आहे.
दरम्यान, २८ जूनला हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे एक पोस्ट शेअर करीत सांगितले होते. तिने लिहिले होते, “मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग झाला आहे. हे आव्हानात्मक असले तरी मी ठीक आहे. या आजारावर मात करण्याचा मी दृढनिश्चय केला असून, मी पूर्ण प्रयत्न करीन.”
तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिची काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंट्स करीत हिना खान बरी व्हावी यासाठी प्रार्थना केल्या होत्या. त्याबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील हिना खूप धाडसी आहे. या सगळ्यावर ती मात करण्यास समर्थ आहे, असे म्हणत तिला प्रोत्साहन दिले होते.