Marathi Actress Fan Of Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अलीकडची तरुणपिढी आपला आदर्श मानते. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असून, भारतातील बॉलीवूड हिरो-हिरोइनपेक्षा विराटचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. अनेक बॉलीवूड स्टार्स विराटचे चाहते आहेत. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांना देखील विराट प्रचंड आवडतो.
लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये झळकणारी अभिनेत्री रुचिरा जाधव सुद्धा विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ( RCB ) १७ वर्षांनी आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यावर सुद्धा रुचिराने खास पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
रुचिरा जाधवने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी जयंती वाघधरेने रुचिराला विराट कोहलीबद्दल विचारलं. यावर रुचिराने विराटचं नाव ऐकल्यावर आजकाल मी लाजते असं म्हटलं. याशिवाय अभिनेत्रीला कोहलीचा एक गुण प्रचंड आवडतो. ती नेमकं काय म्हणालीये जाणून घेऊयात…
रुचिरा जाधव म्हणाली, “इश्य! आजकाल मी त्याचं नाव ऐकल्यावर लाजते… मला विराट फार आवडतो. विशेषत: मला त्याचं मैदानावरचं अग्रेशन खूप आवडतं. तो एकदम अनफिल्टर म्हणजेच जसा आहे तसा वागतो. जिथे टीमला खरंच गरज असते त्या मॅचला विराट कोहली खेळतो. तो खरंच माणूस म्हणून खूप मस्त आहे… त्याचा एक गुण मला विशेष आवडतो तो म्हणजे विराट क्रिकेटच्या बाबतीत खूप जास्त पॅशनेट आहे. क्रिकेट त्याचं प्रेम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्याच्या प्रोफेशनशी खूप जास्त प्रामाणिक आहे. मला त्याची ही गोष्ट खूप जास्त भावली.”
“विराट फिल्डिंग करत असताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो. त्याच्याबद्दल नेहमी बोलतात, विकेट मिळाल्यावर बॉलरपेक्षा विराट जास्त सेलिब्रेट करतो… त्याचं ते मैदानातील अग्रेशन, त्याचं सेलिब्रेशन… सगळंच मला आवडतं आणि अर्थात अनुष्काही आवडते” असं रुचिराने सांगितलं.
दरम्यान, रुचिरा जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये झळकली आहे. याशिवाय रुचिराने ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही महिन्यांपूर्वी अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.