Titeeksha Tawde on sister Khushboo Tawde: तितीक्षा तावडे व खुशबू तावडे या दोघी बहिणी अभिनय क्षेत्रात अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत अनेक गोष्टी शेअर करतात. तसेच, त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातीलही खास गोष्टी त्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात.

“तिच्या डोक्यात नेहमी काही ना काही…”

याबरोबरच, तितीक्षा व खुशबू अनेकदा एकमेकांबद्दलही भावना व्यक्त करतात. एकमेकींबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. काही वेळा एकमेकींबरोबर वेळ घालवतात, एकमेकींचे किस्से सांगतात. नुकताच खुशबूचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तितीक्षाने तिच्या भावना व्यक्त केल्या. खुशबूबरोबरचे काही फोटो शेअर करीत तिने लिहिले, “खुशबू माझ्या ओळखीच्या सर्वांत कूल मुलींपैकी एक आहे. त्याशिवाय ती दोन गोड मुलांची आई आहे. त्यासाठी तिला अवॉर्ड द्यायला हवा.”

पुढे तितीक्षाने लिहिले, “तिच्या डोक्यात नेहमी काही ना काही कल्पना येत असतात. काही भन्नाट, काही विचित्र आणि काही तर अक्षरशः घाबरवून सोडणाऱ्या असतात. पुढे जाऊन याच कल्पनांचं रूपांतर वेगवेगळ्या बिझनेसमध्ये होतं. खुशबू या कल्पना प्रत्यक्षात आणू शकते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खुशबू महत्त्वांकाक्षी आहे. अर्थात, तिला आळस आला नाही, तर ती काहीही करू शकते. कारण- एकदा तिला आळस आला की, जग जिंकण्याच्या तयारीत असलेली हीच मुलगी अचानक पूर्ण एक दिवस काहीही न करण्यासाठी राखून ठेवते. खुशबूची विनोदबुद्धी कमाल आहे; पण तिचे विनोद समजून घेण्यासाठी तुमचीही विनोदबुद्धी तितकीच उत्तम असायला हवी. नाही तर ती स्वतःच्या विनोदावर खळखळून हसताना तुम्हाला अवघडल्यासारखे होईल.”

“जर तुम्हाला वाटत असेल की, खुशबू शांत, समजूतदार आहे, तर ती…”

तितीक्षाने असेही लिहिले, “जर तुम्हाला वाटत असेल की, खुशबू शांत, समजूतदार आहे, तर ती कशी आहे, हे तुम्हाला नीट माहीतच नाही. ती वेडी आहे. तिचा वेडेपणा पाहायचा असेल, तर तुमचा समावेश तुमच्या जवळच्या लोकांमध्ये असायला हवा. दुर्दैवाने, या खास मंडळाची क्षमता फक्त पाच लोकांची आहे. ती खूप सुंदर पद्धतीने मोठी होत आहे. तिच्यात शहाणपणा येत आहे (याबाबत वाद होऊ शकतात), अधिक वेडी होत आहे. प्रत्येक वर्षी ती जास्त कूल होत आहे.”

शेवटी तिने खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तितीक्षाने लिहिल्याने या पोस्टवर खुशबूने कमेंट करत प्रेम व्यक्त केले. तसेच, इतर कलाकारांनी कमेंट्स करीत खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही खुशबूला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, तितीक्षा लवकरच बंडखोर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने याआधी मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर, खुशबूदेखील अनेक मराठी मालिकांत दिसली आहे. आता आगामी काळात या दोघी अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.