Titeeksha Tawde Shares Her Experience From Jaipur Trip : सोशल मीडियाच्या काळात हल्ली अनेक सेलिब्रिटीसुद्धा अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडिया क्रिएटर म्हणूनही काम करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर या अभिनेत्री. दोघीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्या यामार्फत त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर व सुरुची अडारकर यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. तिघी अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटो व रील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वीच तितीक्षा, ऐश्वर्या व सुरुची राजस्थान येथे ट्रिपला गेल्या होत्या. तितीक्षा व ऐश्वर्या यांनी तेथील व्लॉग त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केले. अशातच तितीक्षाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमधून तिने राजस्थानमध्ये त्यांच्याबरोबर घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. यावेळी त्यांना तेथील एका प्रसिद्ध ठिकाणी जाताना आलेला अनुभव अभिनेत्रीने यामधून सांगितला आहे. तितीक्षा नेमके काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

तितीक्षाने सांगितला ‘तो’ अनुभव

तितीक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून ती म्हणाली, “आज आमचा जयपूरमध्ये दुसरा दिवस आहे. पण, आमच्या दिवसाची सुरुवात जरा वेगळी झाली. कारण- येथील बाबू बाजारबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे. म्हणून आम्ही तिथे जाण्यासाठी एक गाडी बुक केली होती. ते आम्हाला म्हणाले की, बाबू बाजार बंद आहे आणि आज तिथे कोणीतरी व्हीआयपी येणार आहे म्हणून त्या जवळच्या दोन किलोमीटरच्या रस्त्यापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. त्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि ते म्हणाले की, मी तुम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, जिथे तुमची खूप चांगली खरेदी होईल. आम्ही म्हटलं ठीक आहे.”

Award Banner

जयपूरमधील तो अनुभव सांगत तितीक्षा पुढे म्हणाली, “ते आम्हाला एका छोट्याशा मॉलसारख्या दुकानात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर सगळं असं बंद आणि अंधार वगैरे होता. मग आम्ही त्यांना म्हटलं की, इथे आम्हाला काहीच खरेदी करायचं नाहीये. तरी ते आमच्याकडे आग्रह धरत होते; पण आम्ही म्हटलं- नाही आम्हाला काहीच नकोय. त्यावर ते म्हणाले की, ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुम्हाला दुसऱ्या दुकानात घेऊन जातो. मग तिथे थोडीशी आम्हाला शंका आली आणि आम्ही म्हटलं की नाही काहीतरी गडबड आहे.”

तितीक्षा पुढे म्हणाली, “कदाचित त्यांना याचं कमिशन मिळत असेल वगैरे. असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही त्यांना म्हणालो की, तुम्ही जा; पण त्यावर ते म्हणाले की, नाही तुम्हाला मी हॉटेलवर सोडतो आणि थोड्या वेळाने न्यायला येतो. मग आपण दुसऱ्या दुकानात जाऊ. पण, मी म्हटलं- नको आम्ही बघतो काय करायचं ते आणि तेव्हा आम्ही एक रिक्षा पकडली आणि सांगितलं की, बाबू बाजारला जायचंय. तो माणूस आम्हाला १५ मिनिटांमध्ये बाबू बाजारला घेऊन गेला आणि मार्केट अगदी व्यवस्थित सुरू आहे. आता त्या व्यक्तीनं आमच्याबरोबर असं का केलं मला माहीत नाही; पण आता आम्ही बाबू बाजारमध्ये आलोय. “