‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत अभिनेत्री नेहल वडोलिया हिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी तिने गुजराती अभिनेता करण जोशीवर इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. आता तिने राजस्थान रॉयल्सच्या एका क्रिकेटपटूने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचा दावा केला आहे. हा क्रिकेटपटू घटस्फोटित असल्याचंही नेहलने सांगितलं.
‘सुनो इंडिया पॉडकास्ट’मध्ये नेहलला विचारण्यात आलं की, तिला कधी एखाद्या क्रिकेटपटूने मेसेज केला आहे का? यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी तो क्रिकेटपटू कोण असेल, याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. नेहल हसत म्हणाली, “नाव सांगू का? तो इतका प्रसिद्ध नाहीये, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे आणि त्याचा घटस्फोट झाला आहे.”
कसे मेसेज पाठवायचा क्रिकेटपटू?
त्याचे मेसेज कशा प्रकारचे होते? असं विचारल्यावर नेहलने सांगितलं की, तो क्रिकेटपटू तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर रिप्लाय करायचा. तिच्या म्हणण्यानुसार, तो वारंवार तिला ‘हॉट’, ‘ब्युटीफुल’ आणि ‘प्रिटी’ असे मेसेज पाठवायचा.
नेहल पुढे म्हणाली, “आता जर मी मेसेज केला, तर तो पुन्हा मेसेज करायला सुरुवात करेल. मला त्याच्याशी बोलायचंच नाहीये.” आपल्याला त्या क्रिकेटपटूशी बोलण्यात रस नसल्यामुळे नंतर त्याला ब्लॉक केलं, असं नेहलने स्पष्ट केलं.
नेहल वडोलियाच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नेटकर्यांनी तो क्रिकेटपटू कोण असू शकतो, याबाबत अंदाज लावण्यास सुरुवात केली. नेहलने त्या क्रिकेटपटूच्या नावाचा खुलासा केला नसला, तरी सोशल मीडिया युजर्सनी त्याच्याबद्दल तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “शिमरॉन हेटमायर? की तुषार देशपांडे?”, तर दुसऱ्याने कमेंट केली, “चहल राजस्थान रॉयल्समध्ये (RR) होता.” तिसऱ्या एका युजरने थेट विचारले, “चहल भाई तू आहेस का?”
दरम्यान, चहल व धनश्री वर्माचा अलीकडेच घटस्फोट झाला. त्यानंतर त्याचं नाव आरजे माहवशबरोबर जोडलं गेलं होतं.
नेहल वडोलियाचे अभिनेता करण जोशीवर आरोप
काही दिवसांपूर्वी, नेहल वडोलियाने गुजराती अभिनेता करण जोशीने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मेसेज (DMs) केल्याचा जाहीर आरोप केला होता. तिने त्यांच्यातील संभाषणाचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नेहलच्या आरोपानंतर करणने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. तसेच काही लोकांनी तिला सोशल मीडियावरील त्या पोस्ट डिलीट करण्यासाठी आणि या विषयावर शांत राहण्यास सांगितलं होतं, असा दावाही तिने केला.
