TMKOC Fame Nidhi Bhanushali Coma Experience : पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे कलाकार खऱ्या आयुष्यात कोणत्या प्रसंगातून जात असतात याचा त्यांच्या चाहत्यांना कित्येकदा थांगपत्ताही नसतो. मालिकांमध्ये काम करणारे कलाकार तर दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे दररोज १४-१५ तास काम काम केल्याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. असंच काहीसं झालेलं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम निधी भानुशालीबरोबर.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकारांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यापैकी एक नाव म्हणे निधी भानुशाली. निधीनं या मालिकेत सोनू हे पात्र साकारलेलं. अशातच अभिनेत्रीनं तिच्या खासगी खासगी आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. निधीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम, शाळा आणि कोचिंग क्लासेस या सगळ्यात तिचा दिवस कसा जायचा हे तिला कळायचंच नाही आणि त्यामुळे तिला आराम करायला वेळ मिळायचा नाही, ज्याचा परिणाम थेट तिच्या प्रकृतीवर झाला.

निधी भानुशालीने सांगितला ‘तो’ प्रसंग

बियॉण्ड द स्पॉटलाइट विथ गरिमाला दिलेल्या मुलाखतीत निधीनं याबद्दल सांगितलं आहे. निधी तिच्या आयुष्यातील तो खडतर प्रसंग सांगत म्हणाली, “मी १०वीत असताना मी कामही करीत होते. तेव्हा दहावीच्या बॉर्डाच्या परीक्षा असतानाही मी काम करीत होते आणि दहावीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी कोचिंग क्लासला जायचे, शाळेत जायचे आणि कामही सुरू होतं. त्यावेळी माझ्यावर या सगळ्याचा खूप ताण येत होता. मी आईला म्हणायचे की, हे झालं की, मी फक्त झोपणार आहे आणि मला उठवू नको. मी झोपणार आहे. पण, अशा गोष्टी बोलणं चुकीचं आहे. कारण- काही वेळा आपण इतक्या वेळा त्या गोष्टी बोलत असतो की, आपली ती भावना तीव्र होते आणि आपण जे बोलतो, तेच होतं.”

Award Banner

कोमामध्ये होती अभिनेत्री

निधी पुढे म्हणाली, “माझी दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी सर्व भावंडांबरोबर होळी साजरी केली. होळीच्या वेळी पार्टी होती. तिथून परतल्यानंतर मला इन्फेक्शन झालं होतं आणि त्या इन्फेक्शनमुळे मी पुढचा बराच काळ झोपेतच होते. मला मेनिनजायटिस (Meningitis) हे इन्फेक्शन झालं. म्हणजे मेंदुला इन्फेक्शन झालेलं. तेव्हा मला जाणवलं की, मी जे म्हणत होते की मला झोपायचं आहे; तर ते खरं ठरलं होतं. मी काही दिवसांसाठी कोमामध्ये होते. तेव्हा मी फक्त १४ वर्षांची होते.”

निधी पुढे म्हणाली, “मी चार महिने रुग्णालयात होते. सहा महिने मला त्यातून बाहेर यायला गेले. पुन्हा मला चालण्यापासून ते आपण दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी करतो, त्या सगळ्याची पुन्हा स्वत:ला सवय लावत होते. मी आयसीयूमध्येसुद्धा बराच वेळ होते. वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय उपचार सुरू होते. तो काळ खूप कठीण होता. माझ्या कुटुंबीयांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्या आई-बाबांना खूप त्रास झाला; पण माझ्याकडे सकारात्मकतेनं राहण्याशिवाय दुसरं काहीच माझ्या नियंत्रणात नव्हतं.”