TMKOC Fame Tapu Talks About His Audition : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार विविध पात्र साकारताना पाहायला मिळत आहेत; तर काही नवीन कलाकारांचीही अलीकडच्या काळात मालिकेत एंंट्री झाली आहे. यापैकीच एक म्हणजे टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भालुनी. अशातच त्याने या शोमध्ये त्याची कास्टिंग कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये आतापर्यंत तीन जणांनी टप्पूची भूमिका साकारली आहे. सुरुवातीची बरीच वर्षे अभिनेता भव्य गांधी मालिकेत टप्पू हे पात्र साकारत होता. त्यानंतर राज अनादकटची मालिकेत एंट्री झाली. पण, काही कराणांमुळे त्याने या मालिकेचा निरोप घेतला आणि त्यानंतर अभिनेता नितीश भालुनीची या मालिकेसाठी निवड झाली. अशातच आता त्याची निवड कशी झाली, कास्टिंगची प्रक्रिया कशी पार पडली, याबद्दल त्याने सांगितलं आहे.
‘अशी’ झाली मालिकेसाठी निवड
‘अवेसम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “टप्पूसाठी ऑडिशन सुरू होतं, तेव्हा मी माझ्या मित्राबरोबर सेटवर गेलो होतो. म्हटलं ऑडिशन देऊन बघतो काय होतं. त्याने विचारलं की कशी झाली ऑडिशन, मी म्हटलं ठीक झाली. मग आम्ही फिल्मसिटी फिरत होतो. कार तीन महिन्यांनी नंतर आम्ही फिल्मसिटीत गेलो होतो. फिरून झाल्यानंतर आम्ही घरी जात असताना मित्राने डावीकडे गाडी घ्यायला सांगितली. पण माझ्याकडून चुकून उजवीकडे बाईक वळली आणि तिथे मला पुन्हा ते कास्टिंग दिग्दर्शक दिसले.”
नितीश पुढे म्हणाला, “ते म्हणाले, तू अजूनही इथेच फिरतोयस आणि मालिकेचे प्रॉडक्शन हेड सोहल खान यांच्याबरोबर भेट घडवून दिली. त्यांना मी भेटलो आणि त्यांना माझ्याशी बोलून चांगलं वाटलं. त्यांनी विकास सरांना विचारलं की, कसं झालं ह्याचं ऑडिशन? ते म्हणाले, ठीक झालं. मग त्यांनी पुन्हा ऑडिशन घ्यायला सांगितली.”
नितीश पुढे म्हणाला, “मग तिथून माझ्या ऑडिशनची प्रोसेस सुरू झाली. तीच ऑडिशन असित सरांनी पाहिली. त्यांना ती आवडली. मग दुसरा राउंड, तिसरा राउंड आणि मग डान्सची ऑडिशन झाली आणि मग आई-बाबा सेटवर आले.”

