‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या शोमधील जवळजवळ प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. म्हणूनच गेल्या १७ वर्षांपासून हा शो टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. आताही या शोला चांगला टीआरपी मिळतोय. गोकुळधाम सोसायटीतील रहिवासी, त्यांचे दैनंदिन जीवन, जेठालालचे कुटुंब, त्याची क्रश बबिता अय्यर, भिडे व जेठालालच्या कुरबरी, तारक मेहताचा समंजसपणा या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात.
‘तारक मेहता…’ मध्ये जेठालाल गडा ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. मागील १७ वर्षांपासून दिलीप जोशी ‘जेठालाल’ बनून लोकांचे मनोरंजन करत आहेत. ‘जेठालाल’ विवाहित असला तरी बबिता त्याची क्रश आहे. बबिताबरोबर बोलण्याची एकही संधी तो सोडत नाही. बबिता व जेठालाल यांचे एपिसोड प्रेक्षकांनाही फार आवडतात. दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांना तारक मेहता मालिकेत प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. पण खूप लोकांना माहित नाही की की ‘तारक मेहता…’ ही त्यांची पहिली मालिका नाही.
दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांनी आधी एकत्र केलंय काम
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये एकत्र काम करण्यापूर्वी दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांनी २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका झी टीव्हीवर यायची. या मालिकेचे एकूण ७९ एपिसोड होते. यामध्ये दिलीप जोशी यांनी नत्थू मेहता नावाची भूमिका केली होती. तर मुनमुनने ‘मीठी भौजी’ नावाचे पात्र साकारले होते.
ही एक कौटुंबिक मालिका होती. या मालिकेतील कुटुंब लग्नांमध्ये सजावटीचे काम करायचे. या मालिकेत दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, टीकू तलसानिया, डेलनाज, सुलभा आर्या, श्वेता गौतम, राजू खेर यांच्यासह इतरही अनेक कलाकार होते. या शोला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.
मुनमुन दत्ताने केलं दिलीप जोशींचं कौतुक
मुनमुन दत्ता नुकतीच यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली. यावेळी तिने तारक मेहता… मालिका आणि या मालिकेतील कलाकारांबद्दल बरेच किस्से सांगितले. तसेच तिने दिलीप जोशींचं कौतुक केलं. दिलीप जोशींबरोबर खूप चांगलं नातं आहे. ते खूप अनुभवी अभिनेते आहेत, त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे. त्यांच्याबरोबर शूटिंग करताना मला खूप कंफर्टेबल वाटतं. मला काहीच यायचं नाही, तेव्हापासून ते मला ओळखतात. मी अजूनही अभिनय शिकतेय, त्याबद्दल ते बरेचदा माझं कौतुक करतात, असं मुनमुन दत्ता म्हणाली.

