Top 10 Marathi Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारावर ठरवली जाते. गेली तीन वर्षे या यादीत ‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारताना दिसतेय. नुकताच ‘BARC इंडिया’ने २०२६ च्या अकराव्या आठवड्याचा टीआरपी जाहीर केला. यामध्ये ‘झी मराठी’च्या एक-दोन नव्हे तर तब्बल सहा मालिकांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.
टॉप-१० मराठी मालिकांच्या यादीत ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी आणि दुसऱ्या स्थानी आहे अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. यानंतर ‘तारिणी’ने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’वर ‘कमळी’ मालिका पहिल्या स्थानावर होती. पण, आता ‘तारिणी’ने या शर्यतीत बाजी मारली आहे. ‘मिशन शुभलग्न सावधान’ हा ‘तारिणी’मध्ये सुरू असलेला ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
टॉप-१० मालिकांमध्ये ‘तारिणी’ तिसऱ्या स्थानी तर, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आता लवकरच समर स्वानंदीच्या बाबांच्या वाढदिवसासाठी खास महेश काळांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. यामुळे दोघांच्या गोड मैत्रीची सुरुवात होईल.
पाचव्या स्थानी आहे ‘स्टार प्रवाह’ची ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका. यानंतर अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिका आहेत.
टॉप-१० मराठी मालिका
१. ठरलं तर मग – स्टार प्रवाह
२. तू ही रे माझा मितवा – स्टार प्रवाह
३. तारिणी – झी मराठी
४. वीण दोघांतली ही तुटेना – झी मराठी
५. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले – स्टार प्रवाह
६. कमळी – झी मराठी
७. लक्ष्मी निवास – झी मराठी
८. देवमाणूस – झी मराठी
९. तुझ्या सोबतीने – स्टार प्रवाह
१०. सनई चौघडे – झी मराठी
‘झी मराठी’च्या ‘देवमाणूस’ मालिकेला रात्रीच्या उशिराच्या स्लॉटला सुद्धा चांगला टीआरपी मिळतोय, ही मालिका आठव्या स्थानी आहे. टॉप-१० मालिकांच्या यादीत दहावं स्थान ‘सनई चौघडे’ मालिकेला मिळालं आहे. खरंतर, ही मालिका सुरू होऊन आता फक्त एकच आठवडा झालेला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात टॉप-१० मध्ये एन्ट्री घेतल्यावर येत्या काही दिवसांत या मालिकेकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा असणार आहेत.
