Happy Patel Releasing On OTT : आमिर खान निर्मित ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. १६ जानेवारी २०२६ रोजी हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता; पण चित्रपटगृहांत याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अशातच आता तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
‘जागरण’च्या वृत्तानुसार, २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जगभरात फक्त सहा कोटी रुपयांची कमाई केली होती; तर भारतात या चित्रपटाचं कलेक्शन केवळ पाच कोटी रुपये होते. आता चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होणार आहे.
‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ चित्रपट नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दलची अधिकृत पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ १ एप्रिलपासून नेटफ्लिक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आमिर खानची निर्मिती असलेला आणि वीर दास व कवी शास्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘हॅपी पटेल’ हा एक स्पाय रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये वीर दास मुख्य भूमिकेत आहे. तसेच मिथिला पालकर ही मराठमोळी अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहे. मिथिलाबरोबरच आणखी एक मराठी अभिनेत्री या चित्रपटात झळकली आहे ती म्हणजे मधुरा जोशी.
मधुरानं आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात ती ईश्वरीच्या बहिणीची म्हणजेच नम्रता देसाई ही भूमिका साकारत आहे.
‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ या चित्रपटाच्या माध्यमातून मधुरानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिनं याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. “माझा पहिला बॉलीवूड चित्रपट” असं म्हणत तिनं या भूमिकेसाठी तिच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि तिला ही संधी देणाऱ्या सर्वांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली होती. ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’च्या निमित्तानं मधुराला हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. अशातच आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्यादेखील पाहता येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाची कथा एका अशा शेफभोवती फिरते, जो गुप्तहेर (एजंट) बनण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला एका वैज्ञानिकाला वाचवण्याची मोहीम मिळते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक मजेशीर आव्हान येतात. या चित्रपटात मोना सिंगनं खलनायिकेची भूमिका साकारली आहे. आमिर खान आणि इम्रान खान यांच्यादेखील लहान, पण महत्त्वाच्या भूमिका (कॅमिओ) आहेत. चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता न आलेल्या प्रेक्षकांना आता तो ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे.
