Surbhi Bhave shares recipe Of Kokani Style Cashew Curry: कलाकार विविध कलाकृतींबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. डान्स, गाणी, विनोदी रील्स अशा विविध गोष्टी ते शेअर करतात. काही वेळा काही खास क्षणांचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. चाहतेदेखील त्यांच्या व्हिडीओ, फोटोंना उत्तम प्रतिसाद देतात.

अनेक कलाकार विविध पदार्थांच्या रेसिपीदेखील शेअर करतात. एखादा पदार्थ बनविण्याची त्यांची खास पद्धत कोणती आहे, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सांगत असतात.

‘तु ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्री सुरभी भावेदेखील अनेकदा विविध पदार्थांच्या रेसिपी शेअर करीत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत ओल्या काजूंची भाजी कशी करायची ते सांगितले आहे.

Award Banner

ओल्या काजूची भाजी कशी बनवायची?

सुरभीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, “आम्हा कोकणातल्या माणसांना फेब्रुवारी संपत आला की, दोन-तीन गोष्टींचे वेध लागतात किंवा वेड लागतं. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शिमगा, नंतर आंबे आणि त्यानंतर ओले काजू.”

पुढे तिने ओल्या काजूची भाजी करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी तिने ओले काजू, चिरलेला बटाटा, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, तेल आणि मसाले हे साहित्य घेतले.

सुरभी ओल्या काजूची भाजी कशी बनवायची हे दाखवत म्हणाली, “कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट घालायचं. फोडणीमध्येच ओलं खोबरं, कोथिंबीर घालत आहे. त्यामुळे भाजीची चव वाढते. त्यामध्ये चिरलेला बटाटा घातला आहे. ते बटाटे परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये ओले काजू घालायचे. त्यावर थोडं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं. त्यावर झाकण ठेवून वाफ काढायची. साधारण दोन वेळच्या वाफांमध्ये ही भाजी शिजते.”

शेवटी अभिनेत्री असेही म्हणाली,”मनासारखी ओल्या काजूची उसळ तयार झाली आहे. काजू थोडे कमी होते. त्यामुळे मी त्यामध्ये बटाटा घातला. नाही तर तुम्ही फक्त काजूचीदेखील अशाच पद्धतीने भाजी करू शकता.”

आता सुरभीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत तेही अशा पद्धतीने ओल्या काजूची भाजी किंवा उसळ बनवत असल्याचे सांगितले. तसेच, काहींनी वेगळ्या पद्धतीने बनवत असल्याचेदेखील म्हटले; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले.