Marathi Actress Mother Passes Away : मराठी मनोरंजन विश्वातल्या एका लोकप्रिय अभिनेत्रीबाबत दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे. अभिनेत्रीनं स्वत:च आईच्या निधनाची दु:खद पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे भक्ती रत्नपारखी.
लोकप्रिय मराठी मालिकांमधून अभिनेत्री म्हणजे भक्ती रत्नपारखीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनय क्षेत्राप्रमाणेच भक्ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिच्या कामाबद्दलची माहिती देत असते. तसंच स्वत:चे काही खास फोटो-व्हिडीओससुद्धा शेअर करीत असते. अशातच तिनं आईच्या निधनाची पोस्ट शेअर केली आहे.
तुझा हसरा चेहरा सर्वांच्याच लक्षात राहील : भक्ती रत्नपारखी
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तीच्या आईचं निधन झालं. सोशल मीडियावर भक्तीनं आईचा फोटो शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये भक्ती म्हणते, “आई तू माझ्यासोबतच आहेस. तुझा हसरा चेहराच सगळ्यांच्या लक्षात राहील. २२ फेब्रुवारी २०२६ ला आईला देवाज्ञा झाली. तिचं आवडीच स्वयंपाकाचं काम करत असताना घरी आलेल्या पाहुण्यांच स्वागत करुन हसत-हसत कोणाला कसलाही त्रास न देता अचानक गेली.”
माझे आई-बाबा दोघेही असेच अचानक गेले : भक्ती रत्नपारखी
यापुढे ती म्हणते, “अजूनही मला खरं वाटत नाहीय. माझे आई-बाबा दोघेही असेच अचानक गेले. खुप वाईट वाटत आहे. पण ते दोघंही माझ्याबरोबर आहेत.” दरम्यान, भक्तीनं शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी अभिनेत्रीचं सांत्वन केलं आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला धीर दिला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भावुक इमोजीद्वारे दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. तर माधवी निमकरने “काकुंना भावपूर्ण श्रद्धांजली” असं म्हटलं आहे. तसंच कपिल होनरावने “ॐ शांती” व अद्वैत दादरकरने “काळजी घे” असं म्हणत भक्तीचं सांत्वन केलं आहे. तसंच भक्तीच्या चाहत्यांनीसुद्धा या पोस्टखालील कमेंट्समध्ये आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, भक्तीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर विविध नाटक, सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘अगंबाई सासूबाई’, ‘अगंबाई सुनबाई’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
भक्ती सध्या स्टार प्रवाहवरील नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत काम करतेय. या मालिकेत ती मीना वहिनी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत अभिनेत्री एतशा संझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. १९ जानेवारी रोजी सुरू झालेली ही मालिका रात्री १० वाजता प्रदर्शित होते.
