छोट्या पडद्यावर येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. तर, काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप देखील घेणार आहेत. अशीच एक मालिका गेल्यावर्षी ( २०२५ ) जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेने वर्षभराच्या आतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेने गेली वर्षभर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. पण, आता या सिरियलचा शेवट झाला आहे. ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये अशोक फळदेसाई आणि अनुष्का गिते यांची फ्रेश जोडी एकत्र झळकली होती. याशिवाय यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री सीमा घोगळे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. नुकतीच ही मालिका संपली.

मालिका संपल्यावर सन मराठीने अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. “तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ भरभरून प्रेम, साथ आणि आशीर्वादासंग, मायबाप प्रेक्षकांचा आम्ही निरोप घेत आहोत…सर्वांचे आभार”

यासह मालिकेतील कलाकारांनी सुद्धा भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत वैदेहीची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का गिते म्हणाली, “वैदेही या भूमिकेत प्रचंड तेज, एक वेगळाच रुबाब आणि समर्पण होतं…या भूमिकेने अनेक तरुण मुलींना प्रेरित केलं आहे. या भूमिकेबद्दलची प्रत्येक आठवण मी कायम स्मरणात ठेवेन. ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका म्हणजे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीच होती! मला अजूनही आठवतंय…जेव्हा निखिल सरांचा फोन आला आणि ते म्हणाले, पेढे दे! तेव्हा मी अक्षरश: रडले होते.”

“वयाच्या तेराव्या वर्षापासून मी अभिनय क्षेत्रात होते पण, ही भूमिका नशिबातच लिहिली होती. विनोद लव्हेकर सरांना माझ्यातील तो अभिनयाचा किडा दिसला. दादा तू खरंच खूप भारी आहेस आणि तुझ्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आनंददायी अनुभव होता. दादाने अगदी जबरदस्त टीम तयार केली होती. या सगळ्या कलाकारांची आठवण येईल.”

“या टीममधील प्रत्येकाकडून मला खूप काही शिकायला मिळालं. माझ्या संपूर्ण युनिटचे, या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि सन मराठीचे मी मनापासून आभार मानते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेचे चाहते…तेजा-वैदेहीला ( अनुष्का-अशोक ) सगळ्याच चाहत्यांनी खूप खूप प्रेम दिलं, तुमचे आभार. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधीतरी शेवट होतो. तुमची लाडकी वैदेही आता तुमचा निरोप घेत आहे.” असं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, चाहत्यांनी या पोस्टवर असंख्य कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. “ही मालिका खूप सुंदर होती तुम्हाला नक्कीच मिस करणार”, “मिसिंग यू अनुष्का मॅम आणि अशोक सर”, “आमच्या तेजा-वैदेहीला कायम मिस करणार” अशा भावनिक कमेंट्स या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.