Amol Naik Daughter Naming Ceremony: काही कलाकृती अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. वर्षानुवर्ष एखादी गोष्ट, काही पात्रे, कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसते. अशाच कलाकृतींपैकी एक म्हणजे तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे.

मालिकेतील राणादा आणि अंजली ही जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्यांची केमिस्ट्री, त्यांचे डायलॉग्ज आणि त्यांची गोष्ट या सगळ्याचीच प्रेक्षकांना भुरळ पडली होती. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर अंजली पाठक ही भूमिका अक्षया देवधरने साकारली होती. मालिकेतून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली होती. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अमोल नाईकने बरकत ही भूमिका साकारली होती. राणादाचा जवळचा मित्र बरकत ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.

हार्दिक जोशी आणि सिद्धार्थ जाधवची उपस्थिती

अमोल नाईक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत त्याने मुलगी झाल्याची आनंदाची बातमी सांगितली होती. ४ डिसेंबरला अभिनेत्याला मुलगी झाली. आता नुकताच तिचा नामकरण सोहळा पार पडला.

आता अमोलने तिच्या मुलीचं नाव काय ठेवलं आहे, हे जाणून घेऊ…

अमोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘धुरंधर’मधील FA9LA गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा डान्स करत तो मुलीचे नाव काय ठेवले आहे, हे दाखवतो. त्यानंतर तो मुलीला हातात घेत असल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्याच्या मुलीचे नाव अक्षया असे आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले, “श्री स्वामी समर्थ. आज आमच्या घरात आनंदाचा सगळ्यात गोड सोहळा आहे. आमच्या छोट्या राजकुमारीचं बारसं आहे. अक्षया नाव जसं अर्थपूर्ण आहे, तसंच आमचं तिच्यावरचं प्रेम अखंड आणि अनंत आहे.”

पुढे त्याने लिहिले, “तिच्या छोट्या पावलांनी घर सुख, हसू आणि आशीर्वादानं भरून गेलं आहे. आजपासून तिचं नाव फक्त ओळख नाही, तर आमच्या आयुष्याचं सर्वांत सुंदर स्वप्न आहे. ती आमचा अभिमान आणि आमचं संपूर्ण जग आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कायम जसा माझ्याबरोबर आहे, तसाच माझ्या अक्षयाबरोबरही राहू दे.”

अमोलच्या मुलीच्या या नामकरण सोहळ्याला हार्दिक जोशी, सिद्धार्थ जाधव व स्वाती लिमये या कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्यांचे आभार मानले. अमोलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, आगामी काळात अभिनेता कोणत्या मालिकेतून, कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.