Tujhyat Jeev Rangala fame actress entry Gharoghari Matichya Chuli: काही मालिका वर्षानुवर्षे लक्षात राहतात. मालिकेची गोष्ट, त्यातील पात्रे, त्यांची केमिस्ट्री, अवतीभोवतीचे वातावरण, या आणि अशा अनेक गोष्टींचा दीर्घ काळापर्यंत परिणाम राहतो. अशाच काही मोजक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला.
२०१६ ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कोल्हापूरची पार्श्वभूमी असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. राणादा आणि अंजली पाठक या दोन पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांची केमिस्ट्री, त्यांचे प्रेम वेगळेपण असूनही एकमेकांप्रति असलेला आदर आणि एकमेकांना दिलेली खंबीर साथ यामुळे ही मालिका गाजली. विशेष म्हणजे, मालिकेतील फक्त मुख्य पात्रे गाजली असे नाही. राणादाचा मित्र बारक्या तसेच राणा दा आणि मास्तरीण बाई म्हणजेच अंजली यांच्याविरोधात कट कारस्थान करणाऱ्या वहिनीसाहेब असो, प्रेक्षकांना ही सगळीच पात्रे आवडली. या पात्रांनी प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती. अक्षया देवधरने अंजली ही भूमिका साकारली होती. तर, धनश्री काडगांवकरने वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री धनश्री काडगांवकर चर्चेत आली आहे.
धनश्री काडगांवकर सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे लवकरच ती नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ती दिसणार आहे.
अभिनेत्रीची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत एन्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री म्हणते, “घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत माझी नुकतीच एन्ट्री झाली आहे. शर्वरी नावाचं पात्र मी साकारणार आहे. खूप छान टीम आहे. खरंतर या मालिकेतील कलाकार एकमेकांमध्ये मिसळून गेले आहेत. मला वाटतं की गेले एक-दीड वर्ष ही मालिका सुरू आहे. माझी नवीन एन्ट्री होत आहे. पण, मला वाटत नाही की मी या ग्रुपमध्ये नवीन आहे. कारण-काहीजण ओळखीचे आहेत. पण जे ओळखीचे नाहीत, त्यांनीसुद्धा मला चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं आहे. त्यासाठी मी खूप आभारी आहे.”
पुढे ती तिच्या पात्राबद्दल म्हणते,”शर्वरी हे पात्र खूप इंटरेस्टिंग आहे. आता ती काय ट्विस्ट आणणार, त्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागणार आहे. “
ती असेही म्हणाली की, जवळजवळ एक-दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीनवर येतेय, पुन्हा एकदा मालिकेत काम करत आहे. त्यामुळे मी उत्सुक आहेच. पण, स्टार प्रवाहवर मला हे पात्र साकारण्याची संधी मिळतेय, याचा खूपच आनंद आहे. तर मी जेवढी उत्सुक आहे. मला आशा आहे की मला स्क्रीनवर पाहण्यासाठी तुम्हीही तेवढ्याच उत्सुक असाल. तेवढ्याच प्रेमाने, आनंदाने, माझा स्वीकार कराल, अशी मी इच्छा व्यक्त करत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शर्वरीच्या येण्याने घरोघरी मातीच्या चुली मालिकेत नेमके काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
