‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये दोघांनी राणादा अन् पाठकबाईंची भूमिका साकारली होती. ही मालिका जवळपास साडेचार वर्षं सुरू होती. याचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रसारित झाला होता. नुकतीच या मालिकेला १० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने अभिनेता हार्दिक जोशीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक जोशी लिहितो, “१० वर्षं झाली… पण आठवणी अजूनही ताज्याच आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही फक्त एक मालिका नव्हती…ती एक भावना होती, एक नातं होतं, आणि असंख्य प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक सुंदर भाग होती. राणादा आणि पाठकबाईंची प्रेमकहाणी, त्यांचं निरागस नातं, त्यांचे संघर्ष, आणि त्या प्रत्येक क्षणाने मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. १० वर्षांनंतरही त्या आठवणींचा रंग फिका झालेला नाही…कारण काही कथा संपत नाहीत, त्या फक्त आपल्या मनात कायमच्या जिवंत राहतात. १० वर्षांचा हा सुंदर प्रवास…आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ आजही तितकाच मनात रंगलेला आहे. काही मालिका फक्त पाहिल्या जातात…पण काही मालिका जगल्या जातात. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही त्यापैकीच एक.”
अक्षया-हार्दिकची लव्हस्टोरी
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या निमित्ताने हार्दिक-अक्षया खऱ्या आयुष्यातही एकत्र आले. खरंतर मालिका संपल्यावर हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी विचारलं होतं. कारण, त्याच्या आईला अक्षया पहिल्यापासूनच खूप आवडायची. २०१७ मध्ये अक्षया अन् हार्दिकच्या आईचं बोलणं झालं होतं. ‘मला तू सून म्हणून आवडतेस’ असं त्यांनी तिला सांगितलं होतं.

आईच्या हट्टामुळे हार्दिक स्वत: अक्षयाच्या घरी गेला होता आणि सासू-सासऱ्यांना म्हणाला, ‘बघा… मी किती फाटका आहे, हे तुमच्या मुलीला माहितीये…माझी लाइफस्टाइल, माझे खर्च सगळं तिला माहीत आहे. याशिवाय माझ्या कुटुंबाबद्दलही तिला कल्पना होती. मला तुमच्या कोणाच्याही विरोधात जाऊन काहीच करायचं नाहीये” यानंतर अक्षयाच्या घरच्यांनी महिनाभर वेळ घेतला आणि नंतर सगळेच या नात्यासाठी तयार झाले.

हार्दिक याबद्दल सांगतो, “अक्षयाच्या घरी जाऊन आल्यावर महिन्याभराचा वेळ गेला. त्यावेळी माझ्या दुसऱ्या एका मालिकेचंही शूटिंग सुरू होतं. तेव्हा अक्षयाच्या घरच्यांनी मला अचानक लग्नाच्या तारखा पाठवल्या. त्यानंतर अगदी दोन दिवसांत आमचा साखरपुडा झाला. कारण, अक्षयाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला होता…आणि ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया होती म्हणून लगेच आम्ही साखरपुडा केला. माझी आई तर खूप जास्त खूश होती.”
