Mahima Mhatre : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई बालपणापासूनच आपल्यावर योग्य संस्कार करते, आपल्याला योग्य दिशा दाखवते…एकंदर काय तर आपल्या आयुष्यातील सगळं चांगलं-वाईट आईला बरोबर समजतं. आजच्या धावपळीच्या जगात आपण कितीही मोठे झालो, तरी आईने दिलेल्या संस्कारांची शिदोरी आपल्याला योग्य वाट दाखवत असते. रविवारी ( १० मे ) झालेल्या मातृदिनाच्या निमित्ताने ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अभिनेत्रीने आईबद्दलचा खास अनुभव सांगितला आहे.
‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीरा ही मुख्य भूमिका लोकप्रिय अभिनेत्री महिमा म्हात्रे साकारत आहे. महिमा मोठ्या मेहनतीने आणि निष्ठेने तिचं काम पूर्ण करत आलीये. अशारितीने प्रोफेशनल राहण्याचं सर्व श्रेय महिमा आपल्या आईला देते.
महिमा सांगते, “मालिकेत घोडेस्वारीचा सीन करताना अपघात होऊनही केवळ १५ दिवसांत मी कामावर रुजू झाले, आणि हे धाडस मला आईकडूनच मिळालं आहे. माझी आई केवळ गृहिणी नसून वडिलांच्या व्यवसायातही तिचं लक्ष असतं आणि तिथेही आई सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळतेय. घर आणि व्यवसाय यांचा समतोल कसा साधावा, हे मला आईकडून शिकायला आवडेल. सुरुवातीला शिक्षिका असलेल्या आईने संसारासाठी नोकरी सोडली, तरी हार न मानता व्यवसायात यश मिळवलं, याचा मला अभिमान वाटतो.”
“नुकताच माझा साखरपुडा झाला आहे, लग्नानंतर घरच्या माणसांना आणि विशेषतः आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करेन. तरीही माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात आईने केलेलं मार्गदर्शन आणि तिने सांगितलेल्या ‘ट्रिक्स’ सोबत असतीलच, असा मला विश्वास आहे.” असं महिमाने सांगितलं.

दरम्यान, ‘झी मराठी’च्या ‘तुला जपणार आहे’ या थ्रिलर मालिकेमुळे अभिनेत्री महिमा म्हात्रे आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने यामध्ये मीरा ही भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. आता महिमा लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
