Sharvari Lohokare shares BTS: पडद्यावर दिसणाऱ्या अनेक पात्रांची आपल्याला भुरळ पडते. यामागे फक्त त्यांचा अभिनय, त्यांची भूमिका, त्यांचे पात्रच नसते तर ज्या पद्धतीने ते पात्र आपल्यापुढे सादर केले जाते, त्याचेही तितकेच योगदान असते. अगदी मेकअप, कपडे, हेअरस्टाईल अशा अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. विशेषत: हॉरर सिनेमांमध्ये कलकार जी पात्रे साकारतात, त्यांचा इतक्या वेगळ्या पद्धतीने मेकअप केला जातो, त्यामुळे अनेकदा त्यांची भीतीही वाटते. सध्या अशाच लूकमध्ये ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मार्जरी दिसत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मंजिरीला चिरतरुण राहायचे आहे. त्यासाठी तिला बळी द्यायचे होते. यासाठी मंजिरीने अनेक प्रयत्न केले. सर्वात आधी तिने मीराच्या आईला मारले आणि तिचा आत्मा कवडीत कैद करून ठेवला. त्यानंतर तिने तिच्या बहिणीला अंबिका ऊर्फ राधाला मारले त्यानंतर तिने तिच्या वडिलांना कैद केले.

यादरम्यान ती मार्जरीशी संवाद साधत असल्याचे, पुढे काय करायचे, मीरा व अंबिकाला मात देत त्यांचे उद्दिष्ट कसे साध्य करायचे, याबाबत विचारत असल्याचे पाहायला मिळाले. पण, मंजिरीच मार्जरी आहे आणि मार्जरीच मंजिरी असल्याचे नुकतेच समोर आले आहे. मंजिरीपेक्षा मार्जरीचा लूक खूप वेगळा आहे.

अभिनेत्री शर्वरी लोहकरेने शेअर केला व्हिडीओ

मंजिरी ही भूमिका अभिनेत्री शर्वरी लोहकरेने साकारली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, मार्जरीच्या लूकसाठी तयारी करतोय. इथे सगळे आर्टिस्ट आहेत. आता एक वेगळा लूक तुम्हाला दिसणार आहे, त्याची आम्ही तयारी करतोय. त्यानंतर तिची हेअरस्टाईल केली जाते. तिला मेकअप लावला जातो. तिला लांब नखे लावली जातात. पुढे तिला पांढऱ्या केसांचे विग लावले जाते. व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, शर्वरी मार्जरीच्या लूकमध्ये चालत येते आणि विचित्र पद्धतीने हसते. त्यानंतर ती मार्जरीच्या लूकमध्ये सीनचे शूटिंग करते. ती तिचे डायलॉग म्हणते, “कारण मंजिरी म्हणजेच मार्जरी आणि मार्जरी म्हणजेच मंजिरी.” त्यानंतर ती विचित्र पद्धतीने हसताना दिसते.

व्हिडीओच्या शेवटी शर्वरी मार्जरीच्या लूकमध्येच संजू राठोडच्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर डान्स करताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना शर्वरीने लिहिले की, मंजिरीची मार्जरी कशी होते त्याचे पडद्यामागचे क्षण. माझे हेअर स्टाईलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट यांचे खूप आभार; माझ्या संपूर्ण टीमचे खूप धन्यवाद.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “कमाल”, दुसऱ्या एकाने लिहिले, “डेंजर”, एकाने लिहिले, “अरे बापरे, दोघी एकच”, आणखी एकाने लिहिले, “सुंदर शर्वरी ताई”, एकाने लिहिले, “वाह”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सहअभिनेत्री मुग्धा गोडबोले व पूर्णिमा तळवलकर यांनी कमेंट करत शर्वरीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आता तुला जपणार आहे या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.