‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २५ मे २०२५ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अक्षरा, अधिपती, चारुहास, भुवनेश्वरी अशी या मालिकेतील सगळीच पात्रं घराघरांत लोकप्रिय झाली होती. भुवनेश्वरीला पैशांपुढे काहीही दिसत नसतं, ती नेहमी रुबाबात राहणारी बाई असते…शिक्षणाला तिचा विरोध असतो असं या मालिकेचं एकंदर कथानक होतं.
लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकरांनी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अशी निगेटिव्ह शेड असणारी भूमिका साकारली. अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत कविता मेढेकर सांगतात, “चार दिवस सासूचे’ या मालिकेसाठी मी जेवढी मेहनत घेतली होती त्यापेक्षा दुप्पट मेहनत मी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेसाठी घेतली. भुवनेश्वरीच्या भूमिकेला नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं…पण, मनात असा विचार येऊन गेला की, आपल्याला हे खरंच जमेल ना वगैरे…आता भुवनेश्वरी कशी दिसेल, ती कशी वागेल, तिचा रुबाब कसा असेल…कारण, भुवनेश्वरी हे पात्र पूर्णपणे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. अशावेळी तुमचा दिग्दर्शक, तुमची लेखिका, निर्माते या सगळ्यांचा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. शर्मिष्ठा राऊत आमच्या मालिकेची निर्माती होती ती खूप ठाम होती की, आपण कविता ताईला कास्ट करुया ती खूप छान करेल.”
कविता पुढे म्हणाल्या, “मी त्या मालिकेसाठी कोणतीही लूक टेस्ट दिली नव्हती. अद्वैत दादरकर आणि या टीमने माझ्यावर खूप विश्वास दाखवला. मी थेट जाऊन प्रोमो शूट केला होता…बाकी लूक टेस्ट वगैरे काहीच दिली नव्हती. जेव्हा मी भुवनेश्वरीच्या लूकमध्ये पहिल्यांदा स्वत:ला पाहिलं तेव्हाच मला जाणवलं की, आता मी नेहमीसारखी दिसत नाहीये. आता भूमिकेसाठी मेहनत घ्यायची आहे तर पूर्णपणे घ्यायची…वर्कशॉप वगैरे करायचं हे माझं ठरलं होतं. या सगळ्यात मला प्रोडक्शन टीमने सुद्धा खूप मदत केली. भाषा, उच्चार या सगळ्यावर सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली कारण, मी त्यापूर्वी अशाप्रकारची भूमिका साकारली नव्हती.”
“आमचा दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाडने मला सेटवर सल्ला दिला होता की, ताई तुम्ही या लूकमध्ये छान दिसताय…पण, भुवनेश्वरी अशी नाहीये…तिचा स्वभाव वेगळा आहे, तिच्यात एक रुबाब आहे. ती सर्वांना तुच्छ लेखते त्यामुळे तुम्ही सुद्धा शॉटदरम्यान संवाद साधताना कोणाशीही नजरानजर करुन बोलू नका…समोरच्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्याला तुच्छ वाटेल असा लूक द्या असं सगळं मला दिग्दर्शकाने सांगितलं होतं. याशिवाय माझे सहकलाकार सुद्धा खूप चांगले होते. हृषिकेश शेलार, स्वप्नील राजशेखर सर्वांनी मला मदत केली. मी ती मालिका खूप आनंदाने केली…मला खरंच खूप मजा आली.”
“भुवनेश्वरीची भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रत्येकाला आवडायची. कोल्हापुरात आम्ही गेलो होतो तेव्हा काही बायका मला भुवनेश्वरीचा लूक करुन भेटायला आल्या होत्या. भुवनेश्वरीच्या साड्या, शेले हा सगळा ट्रेंड मध्यंतरी सुरू होता. एकंदर भुवनेश्वरी साकारून मला खूप आनंद मिळाला.” असं कविता मेढेकरांनी सांगितलं.

