Shivani Rangole shares photos: काही कलाकृती प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात. मालिकेतील पात्रे, ही पात्रे साकारलेले कलाकार कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका अशाच मालिकांपैकी एक आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका १३ मार्च २०२३ मध्ये सुरू झाली होती; तर २५ मे २०२५ मध्ये या मालिकेने निरोप घेतला होता. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिकेतील भुवनेश्वरी, अधिपती अक्षरा, चारुहास या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा होता.

मालिकेतील अक्षरा हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारले होते. भुवनेश्वरी हे पात्र अभिनेत्री कविता मेढेकर यांनी साकारले होते; तर हृषिकेश शेलारने अधिपती ही भूमिका साकारली होती. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास ही भूमिका साकारली होती.

शिवानी रांगोळेने शेअर केले फोटो

आता देवखेळ या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगदरम्यान हे कलाकार एकत्र आले होते. अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, तिने तिच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.

शिवानीने लिहिले, ” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ची टीम. सध्या झी ५ मराठीवर प्रदर्शित झालेल्या देवखेळ या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगदरम्यान आमचे रियुनियन झाले. खूप मजा आली. आमची मालिका संपून बरेच दिवस झाले; पण आजही लोक आमच्या मालिकेबद्दल खूप प्रेमाने बोलतात. त्यामुळे प्रेक्षकांशी जोडलेले असल्यासारखे वाटते. या मालिकेमुळे आम्ही लोकांच्या लक्षात आहोत, ही भावना खूप छान आहे.”

पुढे तिने लिहिले, “या फोटोमध्ये आमच्या टीममधील काही सदस्य नाहीत; पण त्यांची खूप आठवण आली होती.” तसेच प्रेक्षकांप्रति प्रेम व्यक्त करीत तिने लिहिले, “प्रेक्षकांना खूप प्रेम.”

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्याबरोबर कविता मेढेकर, हृषिकेश शेलार, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार दिसले. अभिनेत्रीच्या साध्या लूकने लक्ष वेधून घेतले.

या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत; तर काहींनी भावूक झाल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेनंतर शिवानी कोहम या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याबरोबरच बे दुणे चार या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. तसेच ती शंकर जयकिशन या नाटकातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. शंकर जयकिशन या नाटकात तिच्याबरोबर महेश मांजरेकर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकांत आहेत.

दरम्यान, आता हे कलाकार आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.