Tula Shikvin Changlach Dhada fame Actors Express Gratitude: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार, कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर, शिवानी रांगोळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले.
प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
पहिल्यांदाच शिवानीबरोबर…
कविता मेढेकर शिवानी रांगोळेबद्दल म्हणाल्या, “गेली दोन-अडीच वर्षे तुम्ही आम्हाला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत बघत आहात. मी पहिल्यांदाच शिवानीबरोबर काम करीत होते. मृणालची सून म्हणून मी तिला ओळखत होते. काही काळानंतर माझ्या असं लक्षात आलं की, तिचा कामाचा अनुभव, तिच्यातील शांतपणा अक्षरामध्ये छान दिसू लागला. प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला काहीतरी देत असतो, तशी प्रगती मी शिवानीमध्ये बघितली.
पुढे हृषिकेश शेलारचे कौतुक करीत कविता मेढेकर म्हणाल्या, “मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी याचं काहीच काम पाहिलं नव्हतं. पण, पहिल्यांदा आम्ही प्रोमोचं शूटिंग करीत होतो, तेव्हा त्याच्यामधील चुणूक पाहिली. त्यानंतर मी त्याच्याबरोबर जसजसे सीन करू लागले, तसतसे अधिपती व त्याची आईसाहेब हे आम्ही खऱ्या अर्थाने जगलो. आम्हाला दोन-अडीच वर्षे काम करताना मजा केली.”
हृषिकेश शेलार म्हणाला, “या मालिकेनं खूप काही दिलं. कलाकार म्हणून आम्हाला या प्रोजेक्टनं खूप काही दिलं. माझी तर हीरो म्हणून ही पहिली मालिका होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या मालिकेनं मला हीरो म्हणून आणि कविताताईला खलनायिका म्हणून पोहोचवलं. कारण- कविताताईला या रूपात कोणीच बघितलं नव्हतं.”
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या की, या मालिकेपुरता हा प्रवास इथेच थांबवतोय. पण, झीबरोबरचा हा प्रवास कायम चालू राहील. व्हिडीओच्या शेवटी मालिकेतील सर्व कलाकार एकत्र सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी मालिकेचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स लिहिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “मालिका खूप छान होती. मालिकेत शिवानी रांगोळे-कुलकर्णी व कविता मेढेकर यांना पहिल्यापासून पाहत आलो आहे. दोघी माझ्या आवडत्या आहेत. हृषिकेश शेलार यांची नकारात्मक भूमिका मी बघितली होती. पण, हीरो म्हणून त्यांनी पहिली मुख्य भूमिका केली. अधिपती व अक्षरा ही जोडी कायम स्मरणात राहीन. पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आम्हाला तुमची आठवण येईल.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान, संपूर्ण टीमला शुभेच्छा.”



दरम्यान, आता हे कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.