‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेता ऋषिकेश शेलार सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये त्याने अधिपती हे पात्र साकारलं आहे. ही मालिका गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून नुकत्याच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला. याशिवाय अक्षरा-अधिपतीची जोडी सुद्धा चाहत्यांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरली आहे. मालिकेत अधिपतीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती त्याच्या पत्नीला म्हणजेच अक्षराला ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. या दोघांमधलं अव्यक्त प्रेम, भुवनेश्वरीमुळे होणारी भांडणं या गोष्टी नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. खऱ्या आयुष्यात अक्षरा-अधिपतीची भूमिका साकारणाऱ्या शिवानी अन् ऋषिकेशचं लग्न झालेलं आहे. शिवानीने २०२२ मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्न केलं. तर, ऋषिकेश शेलारच्या बायकोचं नाव स्नेहा असं आहे. याआधी तिने काही नाटकांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’मध्ये कोर्टरुम ड्रामा! ‘त्या’ व्हिडीओमुळे सिद्ध होणार साक्षीचा खोटेपणा; अर्जुनकडे आहेत ‘हे’ पुरावे, पाहा प्रोमो

ऋषिकेश शेलारच्या लग्नाचा आज ७ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास फॅमिली फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने बायको व मुलीबरोबर खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या लेकीचं नाव ‘रुही’ असं आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खानच्या ‘हैदर’ चित्रपटातील ‘रुहदार’ या भूमिकेवरून ऋषिकेशने आपल्या लेकीचं नाव ‘रुही’ असं ठेवलं आहे.

हेही वाचा : “बाळा, तुला जाऊन ७३० दिवस…” सिद्धू मुसेवालाच्या आईची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “शत्रूंनी माझा एकुलता एक…”

ऋषिकेशने पत्नीबरोबर फोटो शेअर करत या फोटोला “७ वर्षे पूर्ण” असं कॅप्शन दिलं आहे. अर्थात आज ऋषिकेश आणि स्नेहाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ऋषिकेशने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवानी रांगोळेने “तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लव्ह यू” अशी कमेंट या फोटोंवर केली आहे. तर, मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या कविता मेढेकरांनी “Happy anniversary” कमेंट करत या दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ऋषिकेश शेलारचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याआधी त्याने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत ‘दौलत’ हे पात्र साकारलं होतं. ऋषिने साकारलेल्या या नकारात्मक भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला होता.