‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सतत चर्चेत असते. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि येत असलेले ट्वीस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवताना दिसत आहे. प्रेक्षकांना कायमच मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. आता ‘झी मराठी वाहिनी’ने मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अक्षरा सत्य जाणून घेणार का?
‘झी मराठी वाहिनी’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अक्षरा अधिपतीच्या खऱ्या आईबद्दल म्हणजेच चारुलताबद्दल विचार करताना दिसत आहे. चारुलताच जर अधिपतीची खरी आई असतील तर त्यांच्याकडून मला सगळं खरं जाणून घ्यायचाय, असे अक्षरा मनातल्या मनात म्हणताना दिसते. तिच्यासमोर देवीची मूर्ती दिसत आहे. तिच्यासमोर हात जोडत आता तूच कर काहीतरी असे ती म्हणते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अक्षरा आणि अधिपती हनिमूनसाठी बाहेर फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील आणि भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात. जेव्हा अधिपती आणि अक्षरा घरी परत येतात, त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते. ते भुवनेश्वरीला सगळीकडे शोधतात पण ती त्यांना सापडत नाही.
दरम्यानच्या काळात अधिपतीला एक पत्र येते ज्यामध्ये भुवनेश्वरीने आपण सुखरुप असून घराच्या भल्यासाठी परत येणार नसल्याचे लिहिलेले असते. त्यानंतर फोनवर देखील अधिपती आणि भुवनेश्वरीचे बोलणे होते, त्यामध्ये भुवनेश्वरी अधिपतीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगते आणि आपण आता अज्ञातवासात असून घरी परतणार नसल्याचा निरोप देते.
बाजारात अक्षराला एक बाई दिसते, ओळखीची वाटल्याने आणि भुवनेश्वरीच असू शकते या विचाराने ती तिचा पाठलाग करते. समोर आलेल्या बाईला ती भुवनेश्वरी समजत असते पण समोरची महिला तुमचा काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणते. मी भुवनेश्वरी नसून चारुलता आहे, अशी ओळख ती सांगते.
जेव्हा अक्षरा अधिपतीच्या वडिलांबरोबर चारुलताविषयी बोलते. त्यावेळी ते सांगतात, एक मृतदेह होता, चारुशी मिळतीजुळता असा होती. तीचा चेहरा ओळखण्यापलीकडे होता पण तिच्यासारखीच साडी आणि मंगळसूत्र होते.
यावरुन अक्षरा असा विचार करते की, चारुलता मॅडम नक्की गेल्यात हे कुणीच पाहिलं नाही. नक्की काय झालं असेल. चारुलता मॅडमना काही करुन शोधावं लागेल, त्यांना भेटावं लागेल. असे ती स्वत: बरोबर बोलताना म्हणत आहे. आता अक्षराला चारुलता पुन्हा भेटणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.