कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या असंख्य गूढ आणि रहस्यमय कथा. कोकणात गेल्यावर आपल्याला असंख्य नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतात. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. या आगामी सिनेमाचं नाव आहे ‘तुंबाडची मंजुळा’.

होळीच्या निमित्ताने ‘तुंबाडची मंजुळा’ या सिनेमाचं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. कारण हे पोस्टर आहेच तसं…एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा, या दरवाजात अडकलेले काही हात… जणू काही हे सगळे या घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत, असं या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ५ जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

विशेष म्हणजे झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचं दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. झी स्टुडिओजच्यावतीने उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकतील? याची नेमकी गोष्ट काय असेल? आणि तुंबाडची ही मंजुळा कोण असेल? या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

या नव्या चित्रपटाबद्दल बोलतांना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर म्हणतात की, “मराठी प्रेक्षक हा एकाच वेळी जेवढा आधुनिक विचारसरणीचा असतो तेवढाच तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी जोडलेला असतो. यामुळेच आजच्या काळातही आपल्या गावच्या मातीची, तेथील परंपरेची गोष्ट सांगणारा विषय त्याला कायमच भावतो. मागील वर्षी आम्ही आणलेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण. ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावाकडचा वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. सध्या या चित्रपटाचं टीझर पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे. हळुहळू यातील इतर बाबी आम्ही प्रसिद्ध करू… ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतच जाईल हे मात्र नक्की. यानिमित्ताने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आम्ही घेऊन आलो आहोत याचा विशेष आनंद आहे.”

दरम्यान, ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.