टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिनेत्रीने शनिवारी २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्मांनी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खानविरोधात तक्रार दिली आहे. सध्या शिझान पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्याची या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत. तसेच पोलिसांनी तुनिषाने आत्महत्या केलेल्या खोलीतील काही सामानही जप्त केलं आहे.
मंगळवारी पोलिसांनी तुनिषा शर्माच्या रक्ताचे नमुने, कपडे आणि दागिने तपासणीसाठी पाठवले. कलिना लॅबमधून काही कर्मचारी वसईतील मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी तुनिषाने आत्महत्या केलेल्या खोलीची तापसणी केली. तसेच तुनिषाने गळफास घेतलेल्या वस्तूवर आढळलेले रक्ताचे नमूनेही घेतले. तिचे कानातलेही जप्त करण्यात आले आहेत. तुनिषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, त्या आधारे पोलिसांनी कापडही जप्त केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शिझान खानचा फोन आणि त्या दिवशी वापरलेले कपडेही जप्त केले आहेत. या प्रकरणी एकूण १६ जणांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. ही घटना घडली त्या दिवशी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
तुनिषा शर्मा आणि शिझान खान मागच्या ३-४ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण शिझानने ब्रेक-अप केल्याने तुनिषा नैराश्यात असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच त्याचे इतर मुलींशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वनिता शर्मांच्या आरोपांच्या आधारे पोलीस शिझानची चौकशी करत आहेत.