Tv Actress Son मुंबईतल्या कांदिवली भागात एका टीव्ही अभिनेत्रीच्या १४ वर्षांच्या मुलाने उंच इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. ही अभिनेत्री गुजराती टेलिव्हिजनमध्ये काम करते. तिने १४ वर्षांच्या मुलाला ट्युशनला जायला सांगितलं. तेव्हा मुलाला राग आला. या रागाच्या भरात त्याने उंच इमारतीवरुन उडी मारत आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ट्युशनला जाण्यावरुन आई आणि मुलाचा वाद झाला
गुजराती टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री कांदिवली येथील ‘सी ब्रूक’ इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. बुधवारी तिने तिच्या मुलाला ट्यूशन क्लासला जाण्यास सांगितले होते. परंतु मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. यानंतर अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर उडी मारली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
अभिनेत्रीने एकुलता एक मुलगा गमावला
गुजराती टीव्ही अभिनेत्रीने तिचा एकुलता एक मुलगा या घटनेमुळे गमावला. ही टीव्ही अभिनेत्री तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली होती. ती कांदिवलीत तिच्या मुलासह राहात होती. मुलगा असं काही पाऊल उचलेल याची पुसटशी कल्पनाही या अभिनेत्रीला नव्हती. या घटनेमुळे या अभिनेत्रीला मानसिक धक्का बसला आहे. इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने तिला सांगितलं की तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे त्यावेळी या अभिनेत्रीला धक्का बसला. कांदिवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलीस निरीक्षक रवी अदाणे यांनी काय सांगितलं?
पोलिसांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. या प्रकरणात संशयास्पद काही घडलं असावं अशी शक्यता नाही असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र या मुलाला कुणीही आत्महत्या करताना पाहिलं नाही. त्यामुळे सदर घटनेची चौकशी आम्ही करत आहोत या घटनेतील सगळे पैलू तपासून पाहतो आहोत असं कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अदाणे यांनी सांगितलं.