scorecardresearch

किडनी निकामी, आर्थिक चणचण; कुटुंबियांकडे उपचारांसाठी पैसे नसल्याने अभिनेत्रीची प्रकृती गंभीर

‘मेरे साई’ फेम अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती गंभीर आहे.

किडनी निकामी, आर्थिक चणचण; कुटुंबियांकडे उपचारांसाठी पैसे नसल्याने अभिनेत्रीची प्रकृती गंभीर
'मेरे साई' मालिकेचं शूट्ंग सुरू असताना अनाया सोनी चक्कर येऊन खाली कोसळली.

टीव्ही मालिका ‘मेरे साई’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अनाया सोनीची प्रकृती गंभीर आहे. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. ‘मेरे साई’ मालिकेचं शूट्ंग सुरू असताना अनाया सोनी चक्कर येऊन खाली कोसळली. मालिकेचं शूटिंग थांबवून तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र तिच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा न झाल्याची माहिती मिळाली आहे.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री अनाया सोनीच्या वडिलांनी सांगितलं की, “अनायाची एक किडनी निकामी झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. किडनी बदलावी लागणार आहे. सध्या अनाया डायलिसिसवर आहे.” अनायाच्या वडिलांनी त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचंही यावेळी सांगितलं. उपचारांसाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नसल्याने आपल्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- “माझा नवरा मला सुख देतो की…” प्रिया बापटने सांगितला ट्रोलिंगचा धक्कादायक अनुभव

अनाया सोनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आजारपणाची माहिती दिली आहे. तिने लिहिलं, “माझी किडनी निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. माझी प्रकृती खूप गंभीर आहे. सोमवारी मी अंधेरीच्या होली स्पिरिट रुग्णालयात भरती होणार आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझं आयुष्य सोपं राहिलेलं नाही. पण मी रोज ते सोपं करण्याचा प्रयत्न करत होते. मला माहीत होतं हे कधीतरी होणार आहे. पण मला आशा आहे की हे लवकरच संपेल. माझं किडनी ट्रान्सप्लान्ट लवकरच होईल. डायलिसिसनंतर मी किडनीसाठी अप्लाय करणार आहे.”

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांना पत्नी जया यांनी म्हटलं ‘बुड्ढा’, म्हणाल्या “माझ्या मैत्रिणी घरी येतात तेव्हा…”

दरम्यान अनाया सोनी याआधीही आजारी होती. तिचं कुटुंब मागच्या बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येचा सामना करत आहे. अनायाने २०२१ मध्ये सोशल मीडियाद्वारे आर्थिक मदत मागितली होती. त्याचबरोबर २०१५ पासून ती एकाच किडनीवर जगत असल्याचा खुलासाही तिने केला होता. काही वर्षांपूर्वी अनायाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला आपली किडनी दिली होती. पण वडिलांनी दिलेली किडनी तीसुद्धा खराब झाल्यानंतर आता अनायाची प्रकृती गंभीर आहे. तिला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. अनाया सोनीने ‘मेरे साई’ व्यतिरिक्त ‘इश्क में मरजावां’, ‘है अपना दिल तो आवारा’ आणि ‘अदालत’ अशा काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या