Prakriti Nautiyal files for divorce from husband Vandit Shah: अभिनेत्री आकांक्षा चमोलाने नुकतीच गौरव खन्नापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. तसेच उर्मिला कानेटकर व आदिनाथ कोठारे यांनीही १५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडल्याची माहिती समोर आली आहे. ‘नामकरण’ आणि ‘सैराब’ सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रकृती नौटियाल लग्नाच्या अवघ्या २ वर्षांनंतर पतीपासून घटस्फोट घेत आहे. दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. प्रकृती आणि तिचा पती वंदित शाह यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, यावर पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

‘ईटाइम्स’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर सतत होणारे वाद आणि आपापसांतील मतभेदांमुळे प्रकृती नौटियाल आणि तिच्या पतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ६ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

घटस्फोटाचं कारण काय?

    घटस्फोटाच्या या वृत्तावर प्रकृती नौटियालकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण, एका सूत्राच्या हवाल्याने ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, “प्रकृती आणि वंदित एकमेकांच्या प्रेमात होते. सहा महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण लग्नानंतर काही काळातच परिस्थिती बदलली. त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले, वाद होऊ लागले आणि त्यांना जाणवलं की ते दोघे एकमेकांसाठी जोडीदार म्हणून योग्य नाहीत.”

    लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि भांडणांचं प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे आपण एकमेकांसाठी योग्य नसल्याची जाणीव त्यांना झाली. सूत्राने पुढे सांगितलं की, शेवटी या दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. प्रकृतीने लग्न झालं त्याच वर्षी म्हणजे ऑगस्ट २०२४ सासरचं घर सोडलं आणि तेव्हापासून ती पतीपासून वेगळी राहत आहे. अखेर प्रकृती व वंदित यांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

    प्रकृती नौटियालचे करिअर

    ३२ वर्षांची प्रकृती नौटियाल सध्या ‘सैराब’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे. यापूर्वी ती ‘शहजादी… है तू दिल की’ या मालिकेत काम करत होती, पण ती मालिका अचानक बंद झाली. त्याचबरोबर प्रकृती तेलुगू मालिका ‘कार्तिक दीपम’च्या हिंदी रिमेकमध्येही दिसली होती. हा शो डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाला होता, पण कमी टीआरपी रेटिंगमुळे मार्च २०२६ मध्ये तो देखील बंद करण्यात आला.