Marathi Actress Post For Anushri Mane : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या शोच्या अंतिम फेरीत तन्वी कोलते, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि राकेश बापट पोहोचले आहेत. या टॉप-५ स्पर्धकांपैकी एक विजेतेपदाची ट्रॉफी उचलणार आहे.
तन्वी, दीपाली, विशाल, अनुश्री आणि राकेश या टॉप-५ स्पर्धकांचे चाहते, तसेच काही कलाकार मंडळीदेखील आवडत्या स्पर्धकाला सोशल मीडियाद्वारे जाहीरपणे पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीने ‘बिग बॉस मराठी ६’मधील आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा मुणगेकर.
प्रतीक्षा मुणगेकर स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेर करताना दिसते. तसेच ‘बिग बॉस मराठी’ हा शो सुरू झाल्यापासून ती शो व शोमधील स्पर्धकांबद्दलची मतेही आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसत आहे. अशातच आता प्रतीक्षाने शोमधील तिच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ही स्पर्धक म्हणजे अनुश्री माने.
सुरुवातीला तिचा गेम परफेक्ट नव्हता… – प्रतीक्षा मुणगेकर
प्रतीक्षाने अनुश्रीसाठी खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रतीक्षा म्हणते, “बिग बॉस मराठी सीझन ६ चा हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला आणि या सगळ्यात अनुश्री मानेने स्वतःला ज्या पद्धतीने सिद्ध केलंय, ते खरंच कौतुकास्पद आहे. सुरुवातीला तिचा गेम परफेक्ट नव्हता, चुका झाल्या. पण त्या चुका स्वीकारून, स्वतःमध्ये बदल करून, ज्या ताकदीने ती पुढे आली आहे, तोच तिचा खरा जिंकण्याचा हक्क दाखवतो.”
मनापासून वाटतं, तीच जिंकायला हवी… – प्रतीक्षा मुणगेकर
“आज ती फक्त एक स्पर्धक नाही, तर एक स्ट्राँग आणि महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पात्र असलेली स्पर्धक आहे. तिने हा गेम मनापासून, प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने खेळलाय. म्हणूनच मला मनापासून वाटतं की, तीच जिंकायला हवी. अनुश्रीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अनुश्री तूच हक्कदार आहेस”, असंही पुढे म्हणाली आहे.

दरम्यान, अनुश्री ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ जिंकण्यासाठी तिला इन्फ्लुएन्सर्सकडून पाठिंबा मिळतच आहे, याशिवाय तिला मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या ६ व्या सीझनचा विजेता किंवा विजेती कोण होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
