TV Actress Talk About Depression : मनोरंजन विश्वातल्या झगमगाटामागे अनेकदा कलाकारांना दु:ख आणि ताणतणाव सहन करावे लागतात. स्वत:च दु:ख लपवून कलाकार प्रेक्षकांसाठी चेहऱ्यावर हास्य आणतात. आयुष्यातील काही वाईट अनुभवांमुळे काही जण खचतात; तर काही जण त्यावर मात करतात. अशीच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यातील कठीण काळावर मात केली आहे आणि ती अभिनेत्री आहे रश्मी देसाई.

रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘उतरन’ या मालिकेमधील तपस्या या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तयाशिवाय रश्मी ‘बिग बॉस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

रश्मीचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत राहिलं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्यही सतत प्रकाशझोतात होतं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या डिप्रेशनबद्दल मोकळेपणानं सांगितलं आहे. जवळपास आठ वर्षे ती डिप्रेशनमध्ये होती आणि त्या काळात तिच्यावर खूप मोठा ताण होता, असं तिनं सांगितलं.

“जवळपास आठ वर्षे डिप्रेशनमध्ये होते”

झूमला दिलेल्या मुलाखतीत रश्मी म्हणाली, “एक काळ असा होता, जेव्हा मी जवळपास आठ वर्षं डिप्रेशनमध्ये होते. माझ्या मनावर खूप ओझं होतं. त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला आणि नव्यानं सुरुवात करायला मला अनेक वर्षं लागली. पण आता मी पुन्हा उभी राहिली आहे. मला असं वाटतं की, आयुष्यातील चढ-उतार आपण स्वतः ठरवतो.”

ती पुढे म्हणाली, “तुमच्या आयुष्याचा प्रवास कोणी दुसरा ठरवत नाही. मला काम मानसिक शांतता देतं आणि त्यामुळे मी इतर त्रासदायक गोष्टींपासून दूर राहू शकले, हे मला खूप उशिरा समजलं. आता मी काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये चांगला समतोल साधला आहे.”

“मला कामातून काढून टाकण्यात आलं”

वैयक्तिक आयुष्याबरोबरच रश्मीनं टीव्ही इंडस्ट्रीतील अनुभवांबद्दलही प्रतिक्रिया दिली. इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना एका ठरावीक चौकटीत बसवलं जात असल्याचं तिनं सांगितलं. रश्मी म्हणाली, “लोक समोरासमोर भेटले की, गोड बोलतात, चांगलं वागतात. पण, वैयक्तिक पातळीवर माझ्याबरोबर अनेकदा विश्वासघात झाला आहे. मला खूप वाईट वाटतं की, लोक मला इतक्या वर्षांपासून ओळखतात, मी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचा प्रयत्न करीत असते, तरीही मला अनेक ठिकाणी कामातून काढून टाकलं जातं. तेव्हा मला वाटायचं की, कदाचित माझा काळच वाईट चालू आहे.”