Uday Tikekar on Sharmishtha Raut: ‘तारिणी’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील तारिणी, केदार, युवराज, निशी, कौशिकी, दयानंद खांडेकर, सुमी आजी, तारिणीची टीम, जेजे आणि इतर सगळीच पात्रे मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. या मालिकेत स्पेशल क्राइम युनिट वेगवेगळ्या केस सोडवताना पाहायला मिळते.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तारिणीला नुकतेच मिशन तिरंगासाठी निवडले आहे. ही निवड रॉच्या जेष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. ज्येष्ठ अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते उदय टिकेकर यांनी साकारली आहे.

“ती माझी प्रोड्युसर आहे, याचा मला खूप…”

नुकताच उदय टिकेकर यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’शी संवाद साधला. यावेळी त्यांना तारिणी मालिकेतील कलाकारांबरोबर कसे बॉण्डिंग झाले आहे असे विचारले. त्यावर ते म्हणाले की पहिलाच दिवस आहे, हिरोईनबरोबर प्रोमोचे शूटिंग झाले आहे. आता दिवस पुढे जातील, त्याप्रमाणे गट्टी जमेल. गट्टी जमणारच, कारण आपले मराठी कलाकार असे असतात की सगळ्यांची दोस्ती पटकन होते. आजपर्यंत जे मराठीमध्ये काम केले आहे, मग ते टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट असो, सगळ्यांबरोबर दोस्ती फार चांगली झाली आहे; तर इथेही होईलच.”

पुढे मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊतबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी मालिकेच्या दिग्दर्शकाबरोबर फार पूर्वीपासून काम केले आहे. मालिकेची जी प्रोड्युसर आहे, तिच्याबरोबर तर आधी खूप काम केले आहे. मला वाटतं की आम्ही ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका केली होती. तेव्हा ती पिल्लू होती, आता त्या प्रोड्युसरीण बाई झाल्या आहेत. ती माझी प्रोड्युसर आहे, याचा मला खूप आनंद झाला. एक उत्सुकता असते. माझ्याबरोबर तिने आधी काम केलं होतं तेव्हा ती लहान होती, आता ती प्रोड्युसर झाली आहे. तिचे तीन-चार प्रोजेक्ट चालू आहेत. ती धडाडीची आहे. मला बरंही वाटलं की मी तिच्याकडे काम करत आहे.”

ते असेही म्हणाले, “मी आजही तिच्यासाठी तिचा उदू काका आहे आणि माझ्यासाठी ती तेव्हाची शर्मिष्ठा आहे. माझ्या तिला खूप शुभेच्छा आहेत. तिची खूप भरभराट होऊ दे, तिने अजून छान छान प्रोजेक्ट करावेत असे मला वाटते”, असे म्हणत उदय टिकेकर यांनी शर्मिष्ठाला शुभेच्छा दिल्या.

आता ‘तारिणी’ या मालिकेत उदय टिकेकर यांची नेमकी काय भूमिका असणार, त्यांच्या एंट्रीमुळे मालिकेत काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.