Premium

‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

गेली काही वर्ष ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर दरम्यानच्या काळात ती काय करत होती? आणि तिचं शिक्षण काय झालं आहे? हे आता तिने सांगितलं आहे.

Tejashree education

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. त्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं. त्यानंतरही तेजश्री काही कलाकृतींमध्ये झळकली. पण गेली काही वर्षं ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर दरम्यानच्या काळात ती काय करत होती आणि तिचं शिक्षण काय झालं आहे हे तिने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना तिने सांगितलं, “उंच माझा झोका ही मालिका जेव्हा मी केली तेव्हा मी पाचवीत होते. माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात मी तीन वर्षांची असतानाच झाली होती. काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मला ‘उंच माझा झोका’ ही मालिका मिळाली आणि तिने मला घराघरात पोहोचवलं. ती मालिका संपल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत मी ‘मात’ आणि ‘चिंतामणी’ हे दोन चित्रपट केले. ‘मात’ या चित्रपटासाठी मला शासनाचा पुरस्कारही मिळाला. पण हे चित्रपट केल्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या संधी या ‘उंच माझा झोका’ला अनुसरून होत्या किंवा माझ्या वयापेक्षा अगदीच मोठ्या होत्या. त्यामुळे मी अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला. याचं मुख्य कारण म्हणजे ‘उंच माझा झोका’मुळे माझी प्रेक्षकांमध्ये तयार झालेली प्रतिमा मला बदलायची होती.”

आणखी वाचा : “मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेतला कारण…”, ‘उंच माझा झोका’तील छोट्या रमाने केला खुलासा, म्हणाली, “त्या मालिकेमुळे…”

तिच्या शिक्षणाबद्दल बोलताना ती म्हणाली, “दहावी झाल्यानंतर मी ‘झिंदगी नॉट आउट’ ही मालिका केली. मालिकेच्या शूटिंगमुळे मुंबई-पुणे सारखा प्रवास करणं आणि अभ्यास सांभाळणं हे थोडं कठीण असल्याने मी दहावीनंतर बाहेरूनच कला शाखेचं शिक्षण घेतलं. कला शाखेत मी पदवी मिळवली आहे. पण हे सगळं करत असताना लॉकडाऊनच्या काळात अभिनयाबरोबरच मी प्रोडक्शनबद्दल माहिती घेणं, अभिनयाच्या दृष्टीने वाचन करणं, वेगवेगळे जुने चित्रपट आणि नाटकं बघणं या गोष्टी मी अभ्यासासारख्या करत होते.”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता दिसते ‘अशी’, तेजश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत मालिकेचे दिग्दर्शक म्हणाले…

पुढे ती म्हणाली, “मागच्याच वर्षी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. तर आताही मी व्हीएफएक्सबद्दलची माहिती मिळवत आहे, माझं लिखाणही सुरू आहे. अभिनयाव्यतिरिक्त कलाकृती तयार करताना ज्या ज्या बाजू महत्त्वाच्या असतात त्यांची माहितीकरून घेत आहे. भविष्यात मला अभिनयातच करिअर करायचं आहे, पण फक्त अभिनयाचं ज्ञान असण्यापेक्षा या इतर बाजूंबद्दलही माहिती असली तर त्याचा आपल्या कामामध्ये खूप फायदा होतो म्हणून सध्या मी या सगल्याबद्दलही ज्ञान मिळवत आहे. तर आता आगामी काळात मी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईन.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unch majha zoka fame tejashree walawalkar revealed what is her educational background rnv

First published on: 25-09-2023 at 19:26 IST
Next Story
“तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…”