Utkarsh Shinde shares post: उत्कर्ष शिंदे हा गाणी, सिनेमा अशा विविध माध्यमातून मनोरंजन करतो. याबरोबरच उत्कर्ष शिंदे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींबद्दलही तो वेळोवेळी व्यक्त होत असतो, त्याच्या भावना मांडत असतो. बिग बॉसमधील स्पर्धकांच्या खेळावरही तो त्याचे मत मांडत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहतेही कमेंट्स करत त्यांची मते मांडत असतात.
आता उत्कर्षने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्याचा काय अनुभव आला याबद्दल लिहिले आहे. तसेच, चाहत्याबरोबरच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“शिंदेशाहीला बायोडाटा दाखवायची गरज नाही”
उत्कर्षने व्हिडीओ शेअर करत लिहिले, “शिंदेशाहीला बायोडाटा दाखवायची गरज नाही. शिंदेशाहीच्या घरातच बाप मुरलेला आहे. काल T-Series कंपनीच्या येऊ घातलेल्या उत्कर्ष-आदर्शच्या नव्या गाण्याच्या शूटिंगसाठी पुणे–पिंपरी चिंचवड, थेरगाव वसाहतीमध्ये जाण्याचा योग आला. अभिनेता किंवा गायक म्हटलं की लोकांना भेटण्याची, सेल्फी घेण्याची उत्सुकता असतेच. पण, काल मला भेटलेले दोन चाहते माझ्यासाठी फक्त चाहते नव्हते, तर ते माझ्या कर्माची आठवण जपून ठेवणारी माणसं होती. करोनाच्या कठीण काळात मी केलेल्या सामाजिक कार्याच्या आठवणी त्यांनी काल पुन्हा जाग्या केल्या.”
पुढे त्याने लिहिले, “आमच्या इथल्या ५० पेक्षा जास्त घरांना महिनाभराच्या राशनची मदत तुम्ही केली होती, ती आम्ही कधीच विसरणार नाही, असे ते म्हणाले. या चाहत्यांनी हे शब्द बोलले आणि खरंच सांगतो, मन भरून आलं. काल जाणवलं की तुम्ही केलेलं चांगलं कर्म कुठेतरी, कोणाच्या तरी हृदयात कायम जिवंत राहतं. सध्या गाजत असलेल्या ‘शिंदेशाही’बद्दल काही लोक कडू बोलत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यावर ते एक वाक्य बोलले आणि मनात घर करून गेले. ते वाक्य असे की, शिंदेशाहीला बायोडाटा दाखवायची गरज नाही, शिंदेशाहीच्या घरातच बाप मुरलेला आहे. दापोडी–खडकीमधील आजोबांच्या कार्यक्रमाची ख्याती त्यांनी सांगितली. भरभरून प्रेम दिलं. मनापासून कौतुक केलं आणि आशीर्वाद देऊन निरोप दिला.”
उत्कर्षने असेही लिहिले, “मीही शूटिंग संपवलं आणि निघालो. पण, मनात मात्र एकच विचार घेऊन निघालो. तो विचार असा होता की ‘कर्म कर, दरिया में डाल फल की चिंता मत कर.’ तुम्ही एखादं चांगलं रोप लावता ना, तर त्याची सावली कधी ना कधी तुमच्यापर्यंत पोहोचतेच. आज मला जाणवतंय की आम्ही कलाकार स्टेजवर उभे असतो, पण आम्हाला उभं ठेवणारी ताकद तुम्ही असता. तुमचं प्रेम हीच माझी खरी कमाई, तुमचा विश्वास हाच माझा सन्मान, तुमच्या टाळ्या हाच माझा पुरस्कार, तुमचं कौतुक हेच माझं रिवॉर्ड आहे. शेवटी तुम्हीच आमचा अवॉर्ड, तुम्हीच आमचं रिवॉर्ड आणि तुम्हीच आमचा खरा बायोडाटा, मनापासून धन्यवाद. प्रेम असंच राहू द्या.”
उत्कर्षच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, उत्कर्ष आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
