Utkarsh Shinde shares memories of Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. आता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्याबाबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

उत्कर्ष शिंदेने लिहिले, ” ‘राष्ट्रवादी पुन्हा’, ‘आपला दादा लय रुबाबदार’ ते असंख्य लाव्ह कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करताना जेव्हा जेव्हा अजितदादा समोर असायचे, तेव्हा तेव्हा वेगळेच वातावरण असायचे. त्यांच्यासमोर अशी कैक गाणी सादर करताना नेहमीच वेगळी ऊर्जा होती.”

“बारामतीमधील काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. शिंदेशाही परिवाराचा कार्यक्रम होता. माझे वडील व गायक आनंद शिंदे हे कार्यक्रमानंतर तिथेच रेस्ट हाऊसला थांबले. रेस्ट हाऊसला पहाटे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा आला. हा ताफा माननीय अजितदादा पवार यांचा होता.”

Award Banner

“ते म्हणाले राजकारणी अजितदादाने बोलावलं असतं, तर तुम्ही…”

“ते माझ्या वडिलांना म्हणाले की, आनंदभाऊ तुम्ही बारामतीत आहात कळलं म्हणून भेटायला स्वतः आलो. माझ्या येण्यानं तुमची झोप डिस्टर्ब झाली असेल, तर माफ करा. त्यावर माझे वडील म्हणाले की, अहो, अजितदादा कॉल केला असता, तर मी आलो नसतो का? माझ्या वडिलांनी असं म्हणताच ते म्हणाले की, राजकारणी अजितदादानं बोलावलं असतं, तर तुम्ही आला असतातच; पण मी इथे माझ्या आवडत्या गायकाला, माझ्या भावाला भेटायला आलोय आणि आनंदला भेटण्याचा आनंद मी गमवायचा होता का? नियोजित कार्यक्रम आहेत.”

“विचार केला की, आधी तुम्हाला भेटून जावं. चला येतो, काही मदत हवी असेल, तर मला फोन करा, असं म्हणत दादा निघाले. पवार परिवाराबरोबरच्या अशा कैक आठवणी शिंदे परिवार कधीच विसरणार नाही”, असे म्हणत उत्कर्ष शिंदेने अजित पवार यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

उत्कर्षच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आता रुतबा नाही, तो दरारा नाही. तो बारामतीचा आवाज नाही. कित्येक येतील नेते; पण अजित पवार यांच्यासारखा कोणी नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.” दुसऱ्याने लिहिले, “अतिशय संयमी, वैचारिक, धाडशी, बेधडक, प्रेमळ असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली” आणखी एकाने लिहिले, “अत्यंत धाडसी, रोखठोक आणि धडाडीचे हुरहुन्नरी नेतृत्व हरपले”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

उत्कर्ष शिंदेसह मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुबोध भावे, सुनील बर्वे, स्वप्नील जोशी, संकर्षण कऱ्हाडे, अमोल कोल्हे, आर्या आंबेकर अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या भावनांतून दु:ख व्यक्त केले आहे.