Uttar Ramayan Fame Actor Career : १९८० च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने संपूर्ण देशाला वेड लावले होते. या पौराणिक मालिकेच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर, निर्मात्यांनी ‘उत्तर रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला आणले. यामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता यांचे पुत्र ‘लव-कुश’ यांची कथा दाखवण्यात आली होती.
राम-लक्ष्मण आणि सीता हे पात्र साकारणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी देवाचा दर्जा दिला होता. या कलाकारांप्रमाणेच ‘उत्तर रामायण’मधील लव-कुश या जोडीलादेखील प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’मध्ये स्वप्नील जोशीने ‘लव’ची तर मयूरेश क्षत्रमाडे याने ‘कुश’ची भूमिका साकारली होती.
कुठे आहे ‘उत्तर रामायण’ मधील कुश?
लव-कुश या जोडीपैकी स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. मराठी चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या तो ‘लग्न पंचमी’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या दोघांमध्ये कुशची भूमिका साकारणारा छोटा मुलगा म्हणजेच अभिनेता मयूरेश अभिनयापासून दूर आहे. कॉर्पोरेट विश्वात तो एक मोठा बिझनेसमन बनला आहे. मयूरेश क्षेत्रमाडेने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आणि आपले पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले.
अमेरिकेतील ‘वर्ल्ड बँक’मध्ये केले काम
नवभारतच्या वृत्तानुसार, अभिनय सोडल्यानंतर मयूरेश अमेरिकेला स्थायिक झाला. तिथे त्याने फायनान्सचे (वित्त) उच्च शिक्षण पूर्ण केले. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, २००३ पासून त्याने वर्ल्ड बँकमध्ये ‘रिसर्चर’ म्हणून बराच काळ काम केले. त्यानंतर त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मयूरेशच्या करिअरमधील सर्वात मोठे यश २०१६ मध्ये मिळाले, जेव्हा त्याची ‘कमिशन जंक्शन’ (Commission Junction) या जागतिक मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या सीईओ (CEO) पदी नियुक्ती झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२२ पर्यंत या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल १४०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला होता.
मयूरेश सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे स्थायिक
आज एक यशस्वी उद्योजक म्हणून मयूरेश परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करत आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्कमध्ये राहतो. अभिनयाचे क्षेत्र सोडले असले, तरी आजही प्रेक्षक त्याला ‘उत्तर रामायण’मधील ‘कुश’ म्हणून तितक्याच प्रेमाने ओळखतात. मयूरेश क्षत्रमाडे आज न्यूयॉर्कमध्ये स्थायिक असून तो आज कोट्यवधींच्या कंपनीचा कारभार पाहत आहे. बिझनेसमन असलेला मयूरेश भारतात आजही ‘कुश’ म्हणून ओळखला जातो.
