Anushka Sarkate Shared Her Diet Routine :अनुष्का सरकटे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेतून झळकत आहे. अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवानातील घडामोडी यामार्फत शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने आता तिच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल सांगितलं आहे.
अनुष्काला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात आणि ती फुडी आहे, असं तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मुलाखतीत अनुष्का म्हणाली, “मला जेवणातूनच ऊर्जा मिळते. मी खूप फुडी आहे. मला आज जेवणात काय असेल याची खूप उत्सुकता असते.” अनुष्काने या मुलाखतीत तिला भेंडी आणि मेथीची भाजी व मेथीचा पराठा खूप आवडतो असं म्हटलं आहे.
डाएटबद्दल अनुष्का सरकटेची प्रतिक्रिया
अनुष्का मुलाखतीत म्हणाली, “मला भेंडी, मेथी या भाज्या खूप आवडतात. मला मेथीचे पराठेही खूप आवडतात. माझ्या डब्यातल्या सगळ्या भाज्या साध्या असतात. मी मराठवाड्यातली असल्यामुळे मला ठेचा खूप आवडतो. सेटवर सगळे माझ्याकडे ठेचा आहे का असं विचारत असतात. सध्या मी डाएटमुळे पोळ्या खात नाहीये, भाकरी खात आहे.”
अनुष्का पुढे म्हणाली, “मला गोड खायलासुद्धा खूप आवडतं. पण थेट काहीतरी गोड न खाता मी अननस किंवा इतर कोणतंही फळ खाते. डाएट सुरू असल्यामुळे फळं खाते. त्याच्याबरोबर आमच्याकडे वळे लाडू हा एक गोड पदार्थ बनतो, जो मी खाते, तो पौष्टिक आहे. चार वाजता वगैरे भूक लागली तर मी हे खाते.”
केसांसाठी व ॲसिडीटीसाठी अनुष्का करते ‘हा’ उपाय
अनुष्का पुढे म्हणाली, “मी रोज कुठली गोष्ट खात असेल तर तो आवळा आहे. घरचा कच्चा आवळा मीठ टाकून खाते. जेवणानंतर आपण बडीशेप खातो, त्याच्याऐवजी मी एक अख्खा आवळा खाते. केसांसाठी आवळा खूप चांगला असतो. मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, कारण जेवणाच्या वेळा चुकायच्या. त्या सगळ्यावर मी कच्चा आवळा खाऊन नियंत्रण मिळवलं आहे. अजूनही मला आवळा खाल्ल्यानंतर ॲसिडीटी झालेली नाही.”
अनुष्काचा फिटनेस मंत्र
अनुष्का पुढे म्हणाली, “मला बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी आणि बासुंदी हे पदार्थ खूप आवडतात.” मुलाखतीत अनुष्काला पुढे डाएटचा आणि ग्लोइंग त्वचेचा मंत्र काय आहे असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “खरंतर काहीच नाही. मी फार डाएट करणारी मुलगी नाहीये. मी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी, त्यात लिंबू पिळून टाकलं, कधी आलं किसून टाकलं, मेथी किंवा बडीशेप घातली असं करत आली आहे किंवा रोज सकाळी उठून बदाम खाणं हे मी खूप आधीपासून करत आली आहे.”
अनुष्का पुढे म्हणाली, “मी हेच सांगेन की, तुम्हाला आवडतं ते सगळं खा. फक्त थोड्या प्रमाणात खाल्लं की समतोल साधता येतो. आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर जे तेज येतं ते कुठल्याच डाएटमुळे येत नाही, त्यामुळे जे आवडतं ते खा, मन मारू नका.”
