Vachan Dile Tu Mala fame Vinesh Nenurkar exit: ‘वचन दिले तू मला’ मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ऊर्जा आणि हर्षवर्धन जागीरदार हे सतत एकमेकांसमोर येत असल्याचे पाहायला मिळते. आता नुकताच विक्रांत शिर्केचा खून झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले.

“मनाला खूप त्रास होतोय…”

या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “ऊर्जानं विक्रांतवर गोळी झाडली. विक्रांत शिर्केचा खून झाला. विक्रांतची सुपारी देऊन हर्षवर्धन जागीरदारनं आपल्या मुलीच्या अपहरणाचा बदला घेतला. ‘वचन दिले तू मला’ मालिकेमध्ये सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. गोष्टीनं खूप नाट्यमय पद्धतीनं वळण घेतलं आहे. गोष्टीमध्ये खूप ड्रामा चालू आहे आणि असा ड्रामा चालू असला की, एका कलाकाराला खूपच मजा येत असते. मी जी हर्षवर्धन जागीरदार ही भूमिका करतो आहे, ती करायला तर खूपच मजा येतेय. हे सगळं खोटं आहे, ही खोटी गोष्ट आहे हे सगळं माहीत असूनसुद्धा आज मला खूप वाईट वाटतंय. मनाला खूप त्रास होतोय आणि त्याचं कारण म्हणजे यापुढे मालिकेमध्ये विक्रांत शिर्के हे पात्र नसणार आहे.”

पुढे त्यांनी लिहिले, “विनेश नेनुरकर या अभिनेत्यानं विक्रांत शिर्के हे पात्र खूप छान पद्धतीनं साकारलं. एक प्रेक्षक म्हणून मला आणि माझ्या घरच्यांना या मालिकेतील सगळ्यात आवडणारं पात्र म्हणजे विक्रांत शिर्के. विनेशनं एक नकारात्मक भूमिका उत्कृष्टपणे साकारली. त्याचा प्रत्येक सीन आम्हा सगळ्यांनाच भारावून टाकायचा. विक्रांत हे पात्र छान लिहिलं गेलं होतं आणि विनेशनं ते छान पद्धतीनं साकारलं. माणूस म्हणूनसुद्धा विनेश अतिशय गोड मुलगा आहे. खूप हुशार, ए आय टेक्नॉलॉजीचा मास्टर आहे. खूप गोष्टी असणारा तो उत्तम सहकलाकार आहे. आता पुढे मालिकेत तो आपल्याबरोबर नसणार हा विचार मनाला खूप त्रास देतोय; पण गोष्ट सुरू होते ती कधी ना कधीतरी संपणार असतेच. आज तो चाललाय उद्या आम्हीपण जाणारच आहोत. पण, आम्हाला सगळ्यांनाच त्याची खूप आठवण येईल.”

त्यांनी पुढे आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकारांबद्दलही लिहिले, ” ‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या भावाची भूमिका करणाऱ्या शंतनू मोघेने त्याचं ‘सफरचंद’ नाटक सुरू होणार म्हणून मालिकेतून ब्रेक घेतला होता. ओमकार गोवर्धनने साकारलेला आशुतोष केळकर या पात्राचा अपघात होतो आणि मालिकेतून त्यांची एक्झिट होते. तेव्हासुद्धा मला असंच वाईट वाटलं होतं.”

पुढे त्यांनी, “आता या सगळ्या गोड माणसांबरोबर भविष्यामध्ये पुन्हा कधी काम करायला मिळेल की नाही हे सगळं नशिबावरच अवलंबून आहे. पुन्हा एकत्र काम करण्याचा योग किती वर्षांनी येईल हे कोणालाही सांगता येत नाही. या सिनेमा माध्यमाच्या माझ्या प्रवासात असे अनेक प्रसंग, अनेक गोड माणसं छान आठवणी मागे सोडून निघून जातात. त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! याच अभिनय क्षेत्रात त्यांनी खूप यशस्वी, मोठी भरारी घ्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना! विनेश नेनुरकरला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद”, असे लिहीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी सहकलाकारांबरोबर काही फोटो शेअर केले आहेत.

मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर विनेशने कमेंट केली आहे. त्याने, “हे वाचून मला खूप छान वाटलं. खूप भरून आलं. तुमच्याकडून मला इतकं प्रेम मिळतंय, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तुम्ही उत्तम व्यक्ती आहात. मलासुद्धा तुमची खूप आठवण येईल. तुम्हाला खूप प्रेम”, असे लिहीत विनेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आगामी काळात वचन दिले तू मला या मालिकेत काय ट्विस्ट येणार याची उत्सुकता आहे. त्याबरोबरच विनेश कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.