Vachan Dile Tu Mala Serial Off Air: ‘वचन दिले तू मला’ या मालिकेने आज(११ ऑक्टोबर २०२६)ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता मालिका संपल्यानंतर अभिनेता निरंजन कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

‘वचन दिले तू मला’ मालिकेने घेतला निरोप

निरंजन कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मालिकेतील सर्व कलाकारांना भेटताना दिसत आहे. त्याला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “या मालिकेचा शेवटचा दिवस माझ्या सहकलाकार आणि संपूर्ण टीमसह घालवावासा वाटला म्हणून कोणालाही न सांगता अचानक सेटवर पोहोचलो.

पुढे त्याने लिहिले, “समोर सगळ्यांचे प्रेमळ चेहरे पाहिले आणि मन खरंच भरून आलं. एका मालिकेचा शेवट झाला, पण या प्रवासाने मला काय दिलं? तर, खूप सुंदर सहकलाकार, आपुलकीची माणसं आणि एक उत्तम प्रॉडक्शन हाऊस. मोठ्या आणि लाडक्या स्टार प्रवाह परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाली, यासाठी मनापासून कृतज्ञ आहे.”

त्याने स्टार प्रवाह वाहिनी आणि सेव्हन्थ सेन्स मीडियाचे आभार मानले. शेवटी त्याने लिहिले, “मायबाप प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. त्यामुळे हा निरोप नाही. तर, फक्त एका सुंदर प्रवासाला पूर्णविराम आणि नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. लवकरच एका नव्या भूमिकेत, नव्या प्रोजेक्टसह पुन्हा तुमच्या भेटीला येतोय.” या व्हिडीओला निरंजनने प्यार के पल हे गाणे लावल्याचे ऐकायला मिळत आहे.

निरंजनच्या या पोस्टवर मालिकेतील कलाकारांसह प्रेक्षकांनीही कमेंट्स केल्या आहेत. काहींनी मालिका बंद झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, निरंजन कुलकर्णी लवकरच ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत दिसणार आहे.