अभिनेते वैभव मांगले हे मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष ते त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग आहे. तर आता लवकरच ते ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेमध्ये एका भुताची भूमिका साकारताना दिसतील. ते पडद्यावर जरी भुताची भूमिका साकारत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना भुतांची भीती वाटते असं त्यांनी सांगितलं आहे.

गेले काही दिवस या मालिकेचे नवनवीन प्रोमो प्रेक्षकांसमोर येत आहेत. ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. तर या मालिकेत वैभव मांगले या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या एक आत्म्याची भूमिका साकारत आहेत.

आणखी वाचा : Video: …अन् ‘असं’ म्हणत सुबोध भावेने मंचावरच अशोक मामांना केला मुजरा, दृश्य पाहून कलाकारांच्या डोळ्यात आनंदाश्रू

या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, “या मालिकेत मी नरहरपंत नावाच्या दोनशे वर्षांच्या आत्म्याची भूमिका साकारत आहे. तो चंद्रविलासमध्ये का आहे? तो तिथे लोकांना का बोलावतो? हे तुम्हाला पहिल्या भागापासून दिसेल. तर याच बरोबर त्याच्या जोडीला आणखीन एक भूतही आहे, त्याबद्दल प्रेक्षकांना हळूहळू समजेल.”

पुढे ते म्हणाले, “खऱ्या आयुष्यात मला भयपट आवडत नाहीत कारण मला त्याची खूप भीती वाटते. त्यातील संगीताने मला खूप घाबरायला आणि दचकायला होतं. त्यामुळे मी लहानपणी तर भयपट पाहिलेच नाहीत. पण अलीकडच्या काळातही भुताचा चित्रपट पाहिला नाही. भीती नैसर्गिक भावना आहे आणि माणूस जर घाबरला नसता तर तो जिवंतच राहू शकला नसता.”

हेही वाचा : वैभव मांगलेचा ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रामराम, जाणून घ्या कारण…

दरम्यान त्यांच्या चंद्रविलास या मालिकेबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ही मालिका झी मराठीवर २७ मार्चपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.