साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा हिमाचल प्रदेशमध्ये २२ मे रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. वैभवी तिच्या भावी पतीबरोबर हिमाचलमध्ये फिरण्यासाठी गेली असता कार दरीत कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला, परंतु तिचा प्रियकर आणि भावी पती जय गांधी याची प्रकृती आता बरी आहे. अपघातानंतर जय गांधीने संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. यानंतर त्याने वैभवीबरोबर फोटो शेअर करीत भावुक पोस्ट केली आहे.
जयने पोस्टमध्ये लिहिलं आहे. आपण परत भेटेपर्यंत….तुझ्या त्या खास आठवणी नेहमी माझ्या चेहऱ्यावर आनंद देत राहतील.. जर मी तुला थोडा वेळ माझ्या आयुष्यात परत मिळवू शकलो असतो, तर आपण नेहमीप्रमाणे बसून बोलू शकू. “तू कायम माझ्यासाठी स्पेशल राहशील आणि पुढेही असशील. तू आता इथे नाहीस ही वस्तुस्थिती मला नेहमीच वेदना देत राहील, परंतु आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत तू कायम माझ्या हृदयात आहेस…. R I P माझे प्रेम..”
याआधीही जयने वैभवीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये लिहिलं होतं “रोजच्या प्रत्येक मिनिटाला मला तुझी आठवण येते. तू मला अशी सोडून जाऊ शकत नाहीस. मी सदैव तुझे रक्षण करेन, खूप लवकर हे जग सोडून गेलीस. RIP मेरी गुंडी… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
हेही वाचा- “माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”
दरम्यान, वैभवी आणि जय यांचा साखरपुडा झाला होता आणि दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार होते, अशी माहिती समोर आली आहे. “वैभवी आणि जय १५ मे रोजी कुलूला फिरण्यासाठी गेले होते. ते ज्या रस्त्याने प्रवास करीत होते तो रस्ता अतिशय लहान आहे, दोघेही ट्रक पुढे जाण्याची वाट पाहत होते, परंतु ट्रकने वळण घेताच कारला धडक दिली आणि कार दरीत कोसळली,” अशी माहिती अभिनेत्रीचा भाऊ अंकितने दिली आहे.