‘सारं काही तिच्यासाठी’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री वैशाली भोसले काही महिन्यांपूर्वीच आई झाली. लग्नानंतर जवळपास १५ वर्षांनी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला. हा संपूर्ण अनुभव अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितला आहे. याशिवाय वैशालीने ज्या डॉक्टरांकडे प्रेग्नन्सीदरम्यान ट्रिटमेंट घेतली त्यांनीदेखील ‘१५ वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत’ अशी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
वैशाली हा अनुभव सांगताना लिहिते, “चाहूल…२५ सप्टेंबर २०२५ ( गेल्यावर्षी ) ज्याची इतके दिवस वाट पाहत होते..तो दिवस अखेर आला होता. मातृत्वाची पहिली चाहूल…काय आनंद झाला होता सांगू, असं वाटत होतं सगळ्या जगाला ओरडून सांगू..मी गरोदर आहे. पण, आधी आलेल्या वाईट अनुभवांमुळे मी माझ्या भावनांना आवर घातला. सोशल मीडिया काय…नातेवाईक, मैत्रिणी, कोणालाही सांगायचं धाडस झालं नाही. म्हटलं चला ही काय लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. एक दिवस कळेलच तेव्हा वाईट वाटेल काहींना की, आम्हाला सांगितलं नाही. पण, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे…माझी काळजी आहे ते सगळे लोक समजून घेतील आणि अगदी तसंच झालं.”
वैशाली पुढे लिहिते, “माझी फार इच्छा होती..गरोदर असताना काम करण्याची…पण कसलं काय, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला की, हाती धुपाटणंच येतं. ‘रंग माझा वेगळा’ मध्ये काम करताना २०२२ मध्ये मी पहिल्यांदा concive केलं होतं..पण त्यावेळी मला आरामाची गरज आहे बेडरेस्ट घ्यायला सांगितली होती. खूप वर्षानंतर हवा तसा रोल मिळाला होता.. चांगली टीम, चांगलं प्रोडक्शन हाऊस आणि उत्तम Channel..पण, मला काम सोडावं लागलं. या तणावात ना मी कामाकडे लक्ष देऊ शकले ना pregnancy कडे आणि यामुळे Miscarriage झालं. यावेळी मात्र मी डॉक्टरांना या सगळ्याबद्दल आधीच विचारलं होतं. त्यामुळे काम करता आलं नाही पण, एक गोष्ट खूपच छान झाली ती म्हणजे..
माझ्या आयुष्यातल्या ज्या माणसांना मी उगाचच डोक्यावर बसवलं होतं.. सगळं सोडून ज्यांना महत्त्व देत होते.. ती माणसं माझ्या आयुष्यात उगाचच होती.. हे लक्षात आलं. त्या सगळ्यांना मी रामराम ठोकला. हळुहळू माझ्या प्रेग्नन्सी जर्नीला सुरुवात झाली माझ्या हक्काच्या लोकांबरोबर!”
“तीन महिने म्हणजे डोक्यावर टांगती तलवार..ज्यांचे आधी misscarages झाले असतील ते नक्कीच मला समजून घेऊ शकतील. पहिली सोनोग्राफी झाली…बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. ते इवलसं शरीर.. लुटूलुटू हलणारे हात..पाय..खूपच कमाल वाटलं होतं. आपल्या जवळचे असतात त्यांना बरोबर कळतं खुशबू तावडेच्या बाबतीतही तसंच झालं. फक्त फोनवर बोलत असताना तिला समजून गेलं की, मी गरोदर आहे. खुशबू गरोदर असताना मी फार जवळून तिला पाहिलं होतं. इतकी सॉर्टेड, शांत, समाधानी मुलगी आणि कोणत्याही परिस्थितीत तेवढीच खंबीर स्टेबल मुलगी मी आजवर पाहिलेली नाहीये. खूप कौतुक वाटायचं मला तिचं.. माझी प्रेग्नन्सी इतकी छान झाली…याचं सगळं श्रेय मी तिला देते. जरा काही अडचण आली की, मी खुशबूला फोन करायचे. तेजल माझ्या भावाची बायको ती सुद्धा यादरम्यान गरोदर होते. खुशबूनंतर सिद्धीरुपा करमरकरला मी गरोदर असल्याचं समजलं. जिवाला जीव लावणारी सिद्धी.. ती सुद्धा नुकतीच आई झाली होती..असं सगळं छान झालं” असं वैशालीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, वैशालीच्या लेकाच्या बारशाचा सुंदर व्हिडीओ आणि पोस्ट खुशबूने सुद्धा शेअर केली आहे. वैशालीने आपल्या लेकाचं नाव देवांक असं ठेवलं आहे.
