Vallari Viraj Food Choices : हल्ली डाएट, जिम, डेली रूटीन, फिटनेस हे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. त्यात कलाकार म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं असतंच. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यासाठी त्यांचे नियमित डाएट, डेली रूटीन, व्यायाम करण्याची पद्धत असते. अशातच आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराजनं याबद्दल सांगितलं आहे.
वल्लरी विराज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत शेअर करत असते. अशातच आता तिनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं तिच्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडींबद्दल सांगितलं आहे. वल्लरीला काय खायला आवडतं, तिचे फूड चॉईसेस काय आहेत यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
वल्लरीला आहे स्वयंपाकाची आवड
वल्लरी विराज मुलाखतीत पुरणपोळी आइस्क्रीम खात असताना म्हणाली, “मला गोड खायला खूप आवडतं. मी सकाळ, दुपार, संध्याकाळ गोड खाऊ शकते.” पुढे तिला स्वयंपाक येतो का, असं विचारल्यानतंर ती म्हणाली, “हो. मला पोळी, भाजी-भात उसळ, मांसाहार हे सगळं करता येतं. मी आधीच्या मालिकेसाठी जेव्हा एकटी राहत होते तेव्हा स्वत: सगळं बनवायचे. मला थालीपिठसुद्धा बनवता येतं.”
वल्लरीला आवडतात ‘हे’ पदार्थ
वल्लरीला आईच्या हातचं तुला काय जास्त आवडतं, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “माझी आजी रव्याचे लाडू खूप छान बनवायची. मला ते फारच आवडतात. आता डाएटमुळे गेल्या तीन-चार वर्षात तिनं ते बनवलेले नाहीयेत. पण, मला तिच्या हातचे रव्याचे लाडू खूप आवडतात. आईच्या हातच्या मला खूप गोष्टी आवडतात. आई मशरूम राईस खूप छान करते. आमच्याकडे कोळपोहे हा एक प्रकार आहे. माझी आई ते खूप छान करते. पोहे आणि नारळाचा रस व गूळ घालून फोडणी देतात. ते नाश्त्याला खातात. मला खूप आवडतात.”
फूड चॉईसेसबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाली, “कॉलेजमध्ये मला चायनीज खाण्याची चटक लागलेली. देसी चायनीज. पाणीपुरी तर मला कायम हवी असते. मला तीसुद्धा खूप आवडते. मी कॉलेजमध्ये असताना खूप गोड खायचे. कॉलेजमध्ये नाटकाच्या तालमीदरम्यान आम्ही पार्ल्याला फ्रँकी आणि कोल्ड कॉफी असं रोज खायचो. तेव्हा वजन वाढेल, स्कीन खराब होईल, असं काहीच वाटायचं नाही.”
कसा असतो डाएट?
वल्लरीला डाएट कधीपासून करायला लागलीस, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “कॉलेजनंतरच. २२ वर्षांची असेन तेव्हापासून. गेली ४-५ वर्षं मी डाएट करतेय. आधी फार नव्हतं काही; पण आता खूपच डाएट करते.” वल्लरीनं काही दिवसांपूर्वी ‘टेली गप्पा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या डाएटबद्दल सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली, “मला मासे खायला खूप आडवतात. मांसाहार खूप आवडतो; पण मी सगळ्या भाज्यासुद्धा खाते. मला मटार अजिबात आवडत नाही. दही मला जेवताना लागतंच. ७ नंतर मी काहीच खात नाही.”
