Vallari Viraj Marriage Plans: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री वल्लरी विराज कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या वल्लरी विराज झी मराठी वाहिनीच्या ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. श्रावणी या भूमिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
वल्लरी मालिकेबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच, तिच्या मुलाखतींमधील वक्तव्यांचीदेखील वेळोवेळी चर्चा होताना दिसते. वल्लरीने नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला.
“मला स्वयंपाक बनवता…”
यावेळी वल्लरीला विचारले की तुला स्वयंपाक बनवता येतो का? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, मला स्वयंपाक बनवता येतो. म्हणजे मला पोळी, भाजी, भात हा स्वयंपाक येतो. जवळजवळ सगळ्या भाज्या येतात, उसळी बनवता येतात. मला मांसाहारही बनवता येतो.”
ती पुढे म्हणाली, “या आधीची मालिका जेव्हा सुरू होती. तेव्हा मी एकटी राहत होते. त्यावेळी मी स्वत:साठी सकाळी नाश्ता बनवत असे. दुपारचा डबाही बनवून नेत असे आणि रात्रीचंही जेवण बनवायचे. म्हणजे मला रोजचं जेवण छान करता येतं.”
पुढे तिला विचारले की अनेक सेलिब्रिटी सध्या लग्न करत आहेत. तर तुलाही लग्नाबद्दल विचारले जाते का? यावर वल्लरी म्हणाली, “लग्नाचा सीझन सुरू झाला की मला असं वाटतं की आई-बाबा बघणार की आता सगळ्यांची लग्नं होत आहेत.मग ते मलाही लग्नाबद्दल विचारणार. आई-बाबा मला म्हणतात की आता लग्न कर. वयही झालं आहे आणि कामही चांगलं सुरू आहे. लग्न कर.”
“योग्य मुलगा मिळाला की…”
पुढे ती म्हणाली, “माझंही म्हणणं आहे की मला लग्न करायचंच आहे. योग्य मुलगा मिळाला की लग्न करायचं आहे. असं नाही की लग्न करायचं नाही”, असे म्हणत वल्लरीने लग्नाबद्दल तिचे काय विचार आहेत, हे सांगितले.
वल्लरी सोशल मीडियाच्या माध्यामातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येते. विविध फोटो ती शेअर करत असते. तिचे लूक लक्ष वेधून घेतात. तिच्या डान्सचादेखील चाहतावर्ग आहे. हिंदी-मराठी गाण्यांवर ती सादरीकरण करते, तिच्या या डान्स व्हिडीओंचे मोठ्या प्रमाणात कौतुक होते. आलापिनी निसळ आणि वल्लरी विराजच्या अशा सादरीकरणाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे हावभाव, गाण्यांची निवड, पेहराव या सगळ्यांमुळे दोघीही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.
दरम्यान, अभिनेत्रीच्या मालिकेबद्दल बोलायचे तर तिच्या शुभ श्रावणी या मालिकेलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वडिलांचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडणारी श्रावणी, तसेच वेळोवेळी तिला मदत करणारा शुभू दोघेही प्रेक्षकांचे लाडके आहेत. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. आता शुभ श्रावणी मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
