Vallari Viraj and Alapini Nisal: पडद्यावर दिसणारी नाती, पात्रे खऱ्या आयुष्यातही तशीच राहतील याची शक्यता कमी असते. काही वेळा मालिका संपल्यानंतर ते बॉण्डिंग, मैत्री नाहीशी होते. मात्र, काही जण ही नाती टिकवून ठेवतात. अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांची मैत्रीदेखील कायमच लक्ष वेधून घेत असते.
२०२४ ला ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रदर्शित झाली होती. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. वल्लरी विराज, आलापिनी निसळ, शर्मिला शिंदे, शीतल क्षीरसागर, राकेश बापट, राज मोरे असे अनेक कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकांत दिसले होते. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
वल्लरी विराजने आलापिनी निसळला वाढदिवसानिमित्त दिलं खास गिफ्ट
मालिकेत वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी बहिणींची भूमिका साकारली होती. लीला व रेवती अशी त्यांच्या पात्रांची नावे होती. मालिकेत त्यांच्यात उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळत होते. मात्र, फक्त मालिकेतच नाही तर खऱ्या आयुष्यातही त्यांची उत्तम मैत्री आहे. त्या अनेकदा एकत्र दिसतात. त्यांचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
आता वल्लरीने आलापिनीला वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास भेट दिली आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. वल्लरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की त्या दोघी पुस्तकाच्या दुकानात आहेत. वल्लरी आलापिनीला म्हणते की दीड मिनिटात तू जितकी पुस्तकं घेशील ती माझ्याकडून तुला वाढदिवसाचं गिफ्ट. ते ऐकून आलापिनीला आनंद होतो. त्यानंतर ती स्टॉपवॉच सुरू करते. आलापिनी धावपळ करत काही पुस्तके घेते. दीड मिनिट झाल्यानंतरही वल्लरी आणखी काही वेळ स्ट़ॉपवॉच सुरू ठेवते आणि आलापिनीला पुस्तके घेऊन देते. दोन मिनिटांहून जास्त वेळ ती तिला पुस्तके घेऊन देते, त्यानंतर तिला हॅपी बर्थडे म्हणते.
हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, “जेव्हा मी माझ्यासाठी उभी राहू शकत नव्हते, त्यावेळी माझ्यासाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीसाठी मी एवढं तरी करूच शकते. माझ्या खांद्याला दुखापत झाली होती, त्या काळात तू माझ्यासाठी जे काही केलंस, त्यासाठी थँक्यू हा शब्द खूपच लहान वाटतो. आई-वडिलांशिवाय एखादी व्यक्ती माझ्यावर इतकं निःस्वार्थपणे प्रेम करू शकते, याची मला कल्पनाही नव्हती. मला माहीत असलेल्या सर्वांत संवेदनशील, प्रेमळ आणि सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
“तुझी धडपड कधी थांबू नये, तुझी स्वप्नं नेहमी उंच भरारी घेत राहावीत आणि तुझ्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ नये, हीच इच्छा आहे. चांगल्या आणि वाईट काळात माझ्याबरोबर जी व्यक्ती कायम असावी असे मला वाटते ती तू आहेस. शेवटी तिने लिहिले की मला तुझा अभिमान आहे”, असे लिहित वल्लरीने आलापिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आशुतोष गोखले, ऋतुजा बागवे, ऋजुता देशमुख अशा अनेक कलाकारांनी आलापिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
